मुंबई | Mumbai
गेल्या काही दिवसांपासून साताऱ्यातील फलटणमधील डॉक्टर तरुणीच्या आत्महत्या प्रकरणात दररोज धक्कादायक खुलासे होत आहे.पोलीस अधिकारी गोपाळ बदने (Gopal Badne) आणि स्थानिक खासदाराच्या पीएने दबाव आणल्यामुळे आत्महत्येचे पाऊल उचलल्याचे तरुणीने हातावरील सुसाईड नोटमध्ये (Suicide News) लिहून ठेवले होते.या तरुणीने फलटण येथील हॉटेल मधुदीपमधील (Hotel Madhudeep) एका खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केली होती. त्यानंतर या घटनेमुळे राज्यभरात एकच खळबळ माजली आहे. अशातच शिवसेना बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी आज (बुधवार) पुन्हा पत्रकार परिषद घेत त्यांनी महिला डॉक्टरने लिहिलेल्या सुसाईट नोटमधील अक्षर तिचे नसल्याचा दावा केला आहे.
त्या म्हणाल्या की, ” महिला डॉक्टर संपदा मुंडे (Sampada Munde) यांनी हातावर लिहिलेल्या सुसाईड नोटमधील पोलीस निरीक्षक हा शब्द चार पानी लिहिलेल्या पत्रात वेगळा आहे. या चारपानी पत्रात महिला डॉक्टरने निरीक्षक हा शब्द जवळपास नऊ वेळा लिहिलेला आहे.मयत पीडित डॉक्टरच्या हातावरील हस्ताक्षर आणि तिने लिहिलेल्या हातावरील हस्ताक्षर जुळत नाही. त्यामुळे सुसाईट नोटमध्ये महिला डॉक्टरने लिहिलेला तो शब्द चुकीचा कसा असे म्हणत अंधारे यांनी ही हत्या आहे की आत्महत्या आहे? असा खळबळजनक सवाल उपस्थित केला आहे.
यावेळी सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी यासाठी नवी मुंबईची पोलीस अधिकारी अश्विनी बिंद्रे हत्याकांडाचं उदाहरण देत X आणि Y च्या आधारावर संबंधिक प्रकरणाचा उलगडा झाला होता, असे उदाहरण दिले. त्यामुळे फलटणच्या महिला डॉक्टरच्या हातावर पोलीस निरीक्षक लिहिलेल्या शब्दात आणि पत्रात लिहिलेल्या शब्दात तफावत असल्याचे सांगत त्यासाठी त्यांनी पत्राची आणि हातावरील सुसाईट नोटचे फोटो दाखवले. यावेळी पीडितेच्या हातावर निरीक्षक असा शब्द लिहिला असून, त्याला पहिली विलांटी आहे आणि पत्रात दुसरी विलांटी आहे, असा मुद्दा अंधारे यांनी नमूद केला.
मृत्यूनंतर व्हॉट्सअॅप स्टेटस लाईक कसे केले जाऊ शकते?
सुषमा अंधारे यांनी सांगितले की, “मी मयत डॉक्टरची बहीण भाऊ यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, यातील डॉक्टर महिलेच्या भावाशी माझा संपर्क होऊ शकला नाही. तुम्ही वेळेबद्दल काहीतरी प्रश्न उपस्थित करत होत्या, असं मी त्यांना विचारलं. त्यावेळी मला बोलताना समजलं की सातारा डॉक्टरचे प्रकरण समोर आले त्या दिवशी डॉक्टर तरुणीच्या बहिणीने तिला कॉल केला होता. तेव्हा तिला पोलिसांनी सांगितले की, संध्याकाळी त्यांनी (मयत डॉक्टर) आत्महत्या केली आहे. पण रात्री अकरा वाजता संपदा यांच्या स्टेटसला लाईक कशी काय झाली? असा प्रश्न उपस्थित करत अंधारे यांनी संशयित व्यक्तींना चौकशीतून वगळू नये, असे म्हटले. तसेच प्रशांत बनकर आणि पीएसआय गोपाळ बदने यांचे हजर होणे संशयास्पद असल्याचेही त्यांनी नमूद केले.
महिला आयोगाच्या भूमिकेवर संशय
एखादी घटना घडल्यानंतर घटनेच्या ठिकाणी असणारा मुद्देमाल लॅपटॉप किंवा फोन जप्त केले जातात. त्याची माहिती प्रचंड गोपनीय असते, ती माहिती न्यायालयाच्या परवानगीनुसार न्यायालयात सादर करायची असते. मृत डॉक्टरच्या सीडीआर (कॉल डिटेल रेकॉर्ड) वर चर्चा करताना महिला आयोगाने माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचेही सीडीआर सार्वजनिक करण्याची मागणी केली. पोलिसांना हा अधिकार कुणी दिला की, त्या मुलीचा मोबाईल किंवा सीडीआर लीक करायचा अधिकार पोलिसांना कुणी दिला? महिला आयोग कोणत्या अधिकारावर त्याबाबत बोलणी केली. त्यांना अधिकार नसेल तर राष्ट्रीय महिला आयोगाने अशा बेजबाबदार व्यक्तीला ठेवावं की नाही याचा विचार करावं. राजकीय हेतूने प्रेरित होऊन एखादी व्यक्ती पीडितेची बदनामी करत असेल तर अशा व्यक्तीचा सुनील तटकरे यांनी राजीनामा घ्यावा. मुख्यमंत्र्यांनी त्या राजीनाम्याची प्रक्रिया करावी”, अशी मागणी सुषमा अंधारे यांनी केली.




