नाशिक | प्रतिनिधी | Nashik
राज्यभरात एसटी महामंडळाकडे (ST Corporation) १४३३ हेक्टरवर ८१२ मोकळे भूखंड (Plots) आहेत. अनेक ठिकाणी जागा हडप करण्याचा प्रयत्न झाला आहे. काही ठिकाणी अशी प्रकरणे न्यायालयात प्रलंबित असून वर्षानुवर्षे त्या जागा व भाड्याने दिलेले गाळे एसटीच्या ताब्यात मिळालेले नाहीत. म्हणूनच आता या जागा स्वतःच विकसित करण्याचा विचार नव्याने सुरू झाला आहे.
आर्थिक अडचणीत सापडलेल्या एसटीला मोकळ्या जागा एवढेच भांडवल सध्या शिल्लक आहे. मीरा भाईंदर पूर्वेला एसटीच्या स्वतःच्या मालकीची २० हजार चौरस मीटर इतकी जागा असून त्यातील १२ हजार चौरस मीटर इतकी जागा कांदळवन असल्याने तिचा विकास करता येत नाही. आठ हजार चौरस मीटर इतकी जागा विकास करण्यासाठी योग्य असून सदर जागा मीरा भाईंदर महानगरपालिकेला विकसितकरण्यासाठी देण्याची घोषणा राज्याचे नवीन परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी केली आहे. तिथे नव्याने बांधण्यात येणाऱ्या इमारतीतील काही जागा आर. टी. ओ. कार्यालयाला भाड्याने दिली जाणार आहे.
गेल्या वर्षी एसटी महामंडळाच्या लोणावळ्यातील (Lonavala) मोकळ्या जागेत सात मजली हॉटेल आणि पन्हाळ्यात आलिशान रिसॉर्ट उभारण्याचे नियोजन महामंडळाने केले होते. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेसह प्रबासी-पर्यटन आदरातिथ्य व्यवसाय सुरू करणारे एसटी महामंडळ देशातील पहिले महामंडळ ठरणार असल्याचे त्यावेळी जाहीर केले होते. आता त्यात आरटीओ कार्यालयाची भर पडणार आहे. राज्यात मोक्याच्या ठिकाणी एसटी महामंडळाच्या या जागा पडीक स्वरूपात असून अनेक ठिकाणी अतिक्रमणे होत आहेत. जागेचा योग्य वापर, अतिक्रमणे रोखणे आणि महसुलाचे नवे मार्ग खुले करण्यासाठी महामंडळाने एसटीच्या जागेचा पुनर्विकास करण्याच्या धोरणाला वेग देण्याचा निर्णय घेतला आहे.
ठाणे, पुणे आणि कोल्हापूरसह राज्यात एकूण १९ जागांचा पुनर्विकास पहिल्या टप्यात करण्यात येणार आहे. यात ताराबाई पार्क जळगाव, मुक्ताई नगर आगार, पारनेर, लातूर, बीड, माजलगाव, हदगाव, धाराशिव, कळंब, रिसोड, वाशिम, चांदूरबाजार, पुसद, भंडारा, हिंगणा, बाडा यांचा समावेश आहे. पहिल्या टप्प्यात या १९ जागांचा विकास महामंडळ बांधा वापरा- हस्तांतरित करा या तत्त्वावर करणार आहे.
मोकळ्या जागांचा विकास करताना त्यातून एसटी आर्थिक सुदृढ व्हावी, पूर्वीसारखा अनुभव येऊन लालपरीचे वस्त्रहरण होऊ नये याची खबरदारी घ्यावी, अशी अपेक्षा आहे.
श्रीरंग बरगे, सरचिटणीस, महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेस