छत्रपती संभाजीनगर | Chhatrapati Sambhajinagar
मुंबई उच्च न्यायालयाच्या (बॉम्बे हायकोर्ट) लिपिक पदासाठी आज (रविवारी दि.१६ ऑगस्ट) रोजी राज्यभरात आयोजित करण्यात आलेल्या टायपिंग परीक्षेत (Typing Exam) प्रचंड गोंधळ उडाल्याचे समोर आले आहे. सर्व्हर डाऊन होणे, संगणक बंद पडणे आणि कीबोर्डमध्ये बिघाड यांसारख्या गंभीर तांत्रिक अडचणींमुळे संतापलेल्या विद्यार्थ्यांनी राज्यातील विविध परीक्षा केंद्रांवर ठिय्या आंदोलन केले.
छत्रपती संभाजीनगर, कल्याण आणि नांदेडसह अनेक ठिकाणी विद्यार्थी (Student) रस्त्यावर उतरले असून, परीक्षा रद्द करून ती नव्याने घेण्यात यावी, अशी मागणी केली जात आहे.दरम्यान राज्यभरातील हजारो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणाऱ्या या कथित अनाधोंदी कारभारामुळे संतपाची लाट पसरली असून, आता उच्च न्यायालय आणि प्रशासन यावर काय निर्णय घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
आता हेच आमचे जंतर-मंतर’; अभिजीत दीपके आंदोलनात सहभागी
छत्रपती संभाजीनगर येथील परीक्षा केंद्रावर गोंधळ झाल्याची माहिती मिळताच ‘सीजेपी’चे (CJP) प्रमुख अभिजीत दीपके यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन विद्यार्थ्यांची व्यथा जाणून घेतली. विद्यार्थ्यांच्या मागण्यांना पाठिंबा देत ते स्वतः आंदोलनाला बसले. “जोपर्यंत परीक्षा पुन्हा घेण्याचे आश्वासन मिळत नाही, तोपर्यंत जागेवरून उठायचे नाही. आता हेच आपले जंतर-मंतर आहे,” अशी घोषणा करत दीपके यांनी आंदोलनाची हाक दिली. तसेच, राज्यभरातील इतर परीक्षा केंद्रांवरील विद्यार्थ्यांनीही तिथेच बसून आंदोलन करावे, असे आवाहन त्यांनी केले. एवढेच नव्हे तर या परीक्षेत पेपर लीक झाल्याचा गंभीर दावाही दीपके यांनी केला आहे.
कल्याणमध्ये ७ ते ८ तासांपासून ठिय्या; विद्यार्थ्यांचा परीक्षा देण्यास नकार
कल्याण येथील एपीएमसी परीक्षा केंद्रावर सकाळी ७ ते ८ तासांपासून विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू आहे. पहिल्या सत्रातील विद्यार्थ्यांना तांत्रिक अडचणींमुळे परीक्षा देता आली नाही. प्रशासनाने विद्यार्थ्यांकडून तब्बल २१ ते २२ प्रकारच्या तांत्रिक त्रुटींच्या लेखी तक्रारी नोंदवून घेतल्या असून, या तक्रारी उच्च न्यायालयाकडे पाठवून पुढील निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन दिले आहे. दरम्यान, दुसऱ्या सत्रातील विद्यार्थ्यांनीही पहिल्या सत्रासारखाच गोंधळ होईल या भीतीने परीक्षा देण्यास नकार दिला आहे. परीक्षा पुढे ढकलण्यासोबतच केंद्र बदलण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे.




