मुंबई | Mumbai
बीडच्या सायबर विभागातील (Cyber Division) निलंबित पोलीस उपनिरीक्षक अधिकारी रणजित कासले (Ranjit Kasale) यांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणी अटकेत असलेल्या माजी मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराडच्या एन्काऊंटरची आपल्याला ऑफर देण्यात आली होती, असा दावा फेसबुक (Facebook) अकाउंटवर व्हिडीओ पोस्ट करत केला होता.
त्यानंतर आज (शुक्रवार) पुण्यातील (Pune) स्वारगेट येथून बीड पोलिसांनी रणजित कासले यांना ताब्यात घेतले आहे. कासले यांनी मी शरण जाणार असल्याचा व्हिडिओ केला होता. मात्र, त्यापुर्वीच त्यांना ताब्यात घेण्यात आले. यानंतर आता कासले यांना पोलीस सेवेतून (Police Service) बडतर्फ करण्यात आले आहे.
पोलीस महानिरीक्षक छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) परिक्षेत्र यांनी कासले यांना भारतीय संविधानाच्या अनुच्छेद ३११(२)(ब) अंतर्गत सेवेतून बडतर्फ केले आहे. आज (दि.१८ एप्रिल) रोजी बीड पोलिसांनी त्यांना शिवाजीनगर पोलीस ठाणे, बीड येथे नोंद असलेल्या गुन्हा क्रमांक २१३/२५ अंतर्गत, अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा कलम ३(१) (र) अन्वये ताब्यात घेतले आहे.
दरम्यान, रणजित कासले हे काल दिल्लीहून (Delhi) पुण्यात आले होते. यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेऊन ‘ज्या दिवशी मतदान होते, त्यादेवशी माझ्या बँक खात्यात दहा लाख रुपये जमा झाले होते. ईव्हीएमपासून दूर राहण्यासाठी मला हे पैसे देण्यात आले होते, असा खळबळजनक दावा कासले यांनी केला होता. तसेच त्यांनी त्यांचे बँक स्टेटमेंट देखील यावेळी दाखवले होते. त्यानंतर कासले हे पुण्यात एका हॉटेलमध्ये मुक्काम करत असताना पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.