मुंबई | Mumbai
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे (NCP Sharad Pawar) आमदार जितेंद्र आव्हाड (MLA Jitendra Awhad) आणि भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली आहे. विधानभवनाच्या लॉबीमध्ये या दोघांच्या कार्यकर्त्यांमध्ये ही हाणामारी झाली. त्यामुळे विधानभवन परिसरात एकच गोंधळ उडाल्याचे दिसून आले.
मिळालेल्या माहितीनुसार, आव्हाड आणि पडळकर या दोघांचेही कार्यकर्ते आपापसात एकमेकांना भिडले. यात काहींचे कपडेही फाडले गेले. तर काही आमदारांनाही (MLA) याचा त्रास झाला. त्यानंतर विधानसभा अध्यक्षांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत अहवाल आल्यानंतर कारवाईचे आश्वासन दिले आहे.
दरम्यान, कालच भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यात शिवीगाळ झाली होती. यानंतर आज विधानभवनच्या लॉबीमध्ये दोघांच्या कार्यकर्त्यांमध्ये तुंबळ हाणामारी (Beating) झाली. लोकशाहीच्या मंदिरामध्येच सर्वसामान्यांचे प्रश्न मांडण्याऐवजी शिवीगाळ आणि मारामारी सुरू असल्याने राज्याचे भवितव्यावर चिंता व्यक्त होत आहे.
मारहाणीच्या प्रकरणावर जितेंद्र आव्हाड काय म्हणाले?
या मारहाणीच्या घटनेनतंर आमदार जितेंद्र आव्हाड यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी सुरुवातीला पत्रकारांनी प्रश्न विचारताच आव्हाड यांनी हल्ला कोणी केला असं विचारलं. त्यावर पत्रकारांनी पडळकर समर्थकांनी केला असे म्हटले. त्यानंतर जितेंद्र आव्हाड म्हणाले की, “संपूर्ण महाराष्ट्राला दिसलं की हल्ला कोणी केला, आम्हाला यापेक्षा जास्त काही पुरावा द्यायचा नाही. जर तुम्ही विधानसभेत गुंडांना प्रवेश देणार असाल, ते आमच्यावर हल्ला करणार असतील तर आमचे लोक सुरक्षित नाहीत. मला शिवीगाळ केली, मारण्याची धमकी दिली. हे सगळे मलाच मारण्यासाठी आले होते. विधानभवनात आमदार सुरक्षित नसतील तर कशाला आमदार राहायचं, आमचा काय गुन्हा आहे”, असे म्हणत ते चांगलेच संतापल्याचे दिसून आले.




