मुंबई | प्रतिनिधी | Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या बुधवारच्या मुंबई दौऱ्यावरून (Mumbai Tour) शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेसने टीका केली आहे. मोदींच्या दौऱ्यामुळे मुंबईतील वाहतूक रोखून धरल्याबद्दल शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी नाराजी व्यक्त केली आहे. निवडणुकीच्या वेळी जसा हेलिकॉप्टरचा वापर केला जातो तसा वापर करून व्हीआयपी आपल्या ठिकाणी का जात नाहीत? वाहतुकीचे नियोजन योग्यरीत्या का करत नाहीत? व्हीआयपींच्या कार्यक्रमांचा मुंबईकरांनी त्रास का सहन करावा? असे सवाल ठाकरे यांनी एक्स या समाज माध्यमातून केले आहेत.
कामाच्या दिवशी मुंबईत (Mumbai) वाहतूक ठप्प केली जाते. ज्यामुळे लाखो मुंबईकरांना ऑफिसमध्ये पोहचण्यास उशीर होतो. वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर अडकून पडावे लागते. व्हीआयपींच्या कार्यक्रमासाठी २० मिनिटनापेक्षा जास्त वेळ अशी वाहतूक रोखली जाणार असेल तर ते कार्यक्रम सुट्टीच्या दिवशी का घेतले जात नाहीत? कामाचे दिवस का निवडले जातात? अशी विचारणा ठाकरे यांनी केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत येणार म्हणून नुसते रस्ते सजवले, ठिकठिकाणी त्या दिवसापुरती स्वच्छता मोहीम राबवली म्हणजे झालं का? नियमित स्वच्छतेचं काय? प्रदूषणावर नियंत्रण आणण्यासाठी ठोस उपाययोजना कोण राबवणार? मोदीजी, काँग्रेसच्या सत्ता काळात सुरू झालेल्या विकासकाकामांचे श्रेय घेण्यात तुम्ही आणि तुमची महायुती जराही धजावत नाही. पण माझा तुम्हाला एक प्रश्न आह की, अदानीला अर्धी मुंबई विकणं, मुंबई महापालिकेच्या निवडणुका रोखणं आणि मोठे प्रकल्प गुजरातला पळवणं या व्यतिरिक्त तुम्ही मुंबईसाठी काय केलं? असा सवाल मुंबई विभागीय काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी एक्स या समाज माध्यमातून केला आहे.
शिवाय राज्यभरात गुन्हेगारी, बेरोजगारी वाढली आहे. बेरोजगारीच गुन्हेगारीला जन्म देते, ही वस्तुस्थिती आहे. तेव्हा मुंबईकर म्हणून एकच विनंती. श्रेय अवश्य घ्या. पण पहिलं मुंबईकरांना न्याय द्या. आज मुंबईत आपण आपल्या मंत्र्यांची आणि आमदारांची (MLA) शाळा घेणार आहात असं समजलं. मुंबईकरांचे कळीचे मुद्दे तुम्ही आपल्या ‘मास्टर’ क्लास मध्ये घ्याल अशी अपेक्षा बाळगते, असे वर्षा गायकवाड यांनी म्हटले आहे.