मुंबई | Mumbai
काही दिवसांपूर्वी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची (Raj Thackeray) त्यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी भेट घेतली होती. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले होते. त्यानंतर आज सकाळी शिंदेंच्या शिवसेनेचे मंत्री उदय सामंत यांनी राज ठाकरेंची भेट घेतली आहे. या भेटीमुळे आता अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत.या भेटीनंतर सामंत यांनी माध्यमांशी बोलतांना भेटीबाबत भाष्य केले आहे.
यावेळी ते म्हणाले की,” मराठी साहित्य संमेलनाबाबत (Marathi Sahitya Sammelan) राज ठाकरे यांच्याशी चर्चा केली. या भेटीमध्ये कोणत्याही प्रकारची राजकीय चर्चा झाली नाही ही अतिशय साधी आणि सिंपल भेट होती. राज ठाकरे यांच्यासोबत चर्चा केली आणि गप्पा मारल्या की, आणखीन काही गोष्टी कळतात. ही राजकीय भेट नव्हती. राज ठाकरे हे असे व्यक्ती महत्व आहे की, राजकारणाच्या पलिकडे जाऊन आपण त्यांच्याशी गप्पा मारल्या तरीही आपल्या ज्ञानात भर पडते. विश्वमराठी संमेलनाला स्वत: राज ठाकरे उपस्थित होते आणि त्यांचे आभार मानण्यासाठी मी आलो होतो. अमित शहा (Amit Shah) यांच्यासोबत एकनाथ शिंदे साहेबांची जी बैठक ती राज्यातील विकासकामांबद्दल आहे”, असे उदय सामंत यांनी म्हटले.
पुढे ते म्हणाले की,”केंद्रातून राज्यात निधी कसा जास्तीत जास्त आणायचा आणि अमित शहा यांच्या हस्ते वीस लाख लोकांना घरे देण्याचा उपक्रम आहे. बाकी खासगी भेटीत काय चर्चा झाली हे मला माहिती नाही. पालकमंत्रिपदाचा तिढा दोन ते तीन दिवसांमध्ये सुटेल. मराठी भाषा आणि मराठी उद्योजकांवर अन्याय होऊ देणार नाही.मराठी भाषेसाठी, साहित्यासाठी, कलाकारांसाठी काय केले पाहिजे यावर चर्चा झाली. गप्पांच्या माध्यमातून चर्चा झाली असेही मंत्री उदय सामंत यांनी म्हटले.
तसेच मनसे आणि शिवसेनेची (MNS and Shivsena) आघाडी होणार का? या प्रश्नावर बोलतांना उदय सामंत म्हणाले की, “राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे (Eknath Shinde) एकत्र येणार का? हा माझ्या दृष्टीने फार मोठा विषय आहे. या पातळीवरच्या चर्चेत मी कधी पडलो नाही. मला अवाक्यातले, झेपणारे प्रश्न विचारा, त्यावर मी उत्तर देऊ शकतो. एकत्र येण्याबद्दल त्या दोघांमध्ये चर्चा झाली पाहिजे. आजची चर्चा राजकारण विरहीत होती” असेही त्यांनी सांगितले.