Saturday, September 26, 2026
Homeब्रेकिंग न्यूजVinayak Raut Family Dispute News : माजी खासदार विनायक राऊतांची सुनेच्या आरोपांवर पहिली...

Vinayak Raut Family Dispute News : माजी खासदार विनायक राऊतांची सुनेच्या आरोपांवर पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “पैशांसाठीच ब्लॅकमेलिंग…”

मुंबई | Mumbai

शिवसेना (ठाकरे गट) पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) तसेच त्यांचे चिरंजीव मुंबई महापालिकेतील नगरसेवक गितेश राऊत (Gitesh Raut) यांच्यासह कुटुंबावर दाखल झालेल्या गुन्ह्यानंतर राऊत कुटुंबीयांनी माध्यमांसमोर येत सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. सून गिरीजा राऊत हिने आमच्यावर केलेले कौटुंबिक छळ आणि जादूटोणाचे सर्व आरोप निखालस खोटे आणि कपोलकल्पित आहेत, असे स्पष्टीकरण विनायक राऊत यांनी दिले आहे. हा केवळ कोट्यवधी रुपये आणि संपत्ती उकळण्यासाठी केलेला कट असल्याचा प्रतिदावाही त्यांनी केला.

- Advertisement -

ठाण्यातील कापूरबावडी पोलीस ठाण्यात (Kapurbawdi Police Station) गिरीजा राऊत (Girija Raut) यांच्या तक्रारीवरून विनायक राऊतांच्या कुटुंबाविरुद्ध गुन्हा दाखल झाल्यानंतर राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू होती. या पार्श्वभूमीवर विनायक राऊत आणि त्यांचा मुलगा गितेश राऊत यांनी एकत्र येत माध्यमांसमोर आपली बाजू मांडली.

२०१८ च्या कथित घटनेची तक्रार २०२६ मध्ये का? राऊतांचा सवाल

माध्यमांशी बोलताना विनायक राऊत म्हणाले की, “माझा मुलगा गितेश आणि सून गिरीजा हे गेल्या तीन वर्षांपासून एकत्र राहत नाहीत. तक्रारीत तिने २०१८ ते २०२२ या काळात अघोरी कृत्य केले गेल्याचा दावा केला आहे. जर असा काही प्रकार घडत होता आणि तेव्हा तिचे आई-वडीलही तिच्यासोबत असायचे, तर त्यांनी त्याचवेळी तक्रार का केली नाही? आज २०२६ मध्ये, तब्बल चार ते आठ वर्षांनंतर तक्रार केली जात आहे, यावरूनच या संपूर्ण प्रकरणात काहीतरी ‘काळंबेरं’ (संशयास्पद) असल्याचे स्पष्ट होते”, असे त्यांनी म्हटले.

हे देखील वाचा : Vinayak Raut Family Dispute News : पतीचा हनिमूनवेळी शारीरिक संबंधास नकार, मासिक पाळीबाबत…; माजी खासदार विनायक राऊतांच्या कुटुंबावर सुनेचे गंभीर आरोप

फ्लॅट, गाडी आणि १० कोटींची मागणी; खळबळजनक प्रतिदावा

विनायक राऊत यांनी गिरीजा राऊत यांच्याकडून आलेल्या मागण्यांचा पाढा वाचत हा संपूर्ण प्रकार आर्थिक तडजोडीसाठी दबाव आणण्याचा असल्याचे सांगितले. ते म्हणाले, गिरीजा यांनी दर महिन्याला ५ लाख रुपये खर्चासाठी मागितले आहेत. मानसिक नुकसानभरपाई म्हणून २ कोटी रुपये आणि एकूण १० कोटींहून अधिक रकमेची मागणी केली आहे. याशिवाय, मुंबईत ५ रूमचा (३-BHK विथ टेरेस) फ्लॅट आणि एक ऑटोमॅटिक (इलेक्ट्रिक) गाडी मागितली आहे. या अवास्तव मागण्या पूर्ण होत नाहीत हे लक्षात आल्यानंतरच तिने दबावासाठी ही खोटी तक्रार दाखल केली आहे,” असे विनायक राऊत म्हणाले.

अघोरी कृत्यांच्या आरोपांचे पूर्ण खंडन

जादूटोणा विरोधी कायद्यान्वये दाखल झालेल्या गुन्ह्याबाबत बोलताना विनायक राऊत यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “आम्ही अघोरी उपचारांच्या आरोपांचे पूर्णपणे खंडन करतो. आम्ही तशा कुठल्याही पंथातले नाही. हे आरोप धादांत खोटे आहेत” असेही त्यांनी म्हटले.

कोर्टात घटस्फोटाची केस सुरू

गेल्या महिन्यातच घटस्फोटाची (डिव्होर्स) याचिका दाखल करण्यात आली आहे. या संदर्भात तडजोड करण्यासाठी दोन्ही बाजूंच्या वकिलांची बैठकही झाली होती. त्यानंतर कौटुंबिक हिंसाचाराचा उल्लेख करत पुन्हा नोटीस देण्यात आली, अशी माहिती विनायक राऊतांनी दिली. सासरच्या छळाला कंटाळून नव्हे, तर आर्थिक मागण्यांसाठीच हा खोटा गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचा पुनरुच्चार करत याप्रकरणी आपण कायदेशीर लढाई लढण्यासाठी न्यायालयात गेलो असल्याचे विनायक राऊत यांनी स्पष्ट केले.

ताज्या बातम्या