मुंबई | Mumbai
मुंबई, नाशिक, पुण्यासह राज्यातील २९ महापालिकांच्या निवडणुकीची (NMC Election) घोषणा राज्य निवडणूक आयोगाकडून (State Election Commission) सायंकाळी चार वाजता पत्रकार परिषदेत केली जाणार आहे. राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे सांयकाळी चार वाजता सह्याद्री अतिथीगृह येथे पत्रकार परिषद घेऊन महापालिका निवडणुकीचा कार्यक्रम घोषित करणार आहेत. त्यामुळे आजपासूनच राज्यात आचारसंहिता लागू होऊ शकते.
राज्य निवडणूक आयोगाकडून या पत्रकार परिषदेत महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या तारखा आणि संपूर्ण कार्यक्रम जाहीर केला जाईल, अशी माहिती समोर येत आहे. या निवडणुकीमुळे राज्यातील अनेक महत्त्वाच्या शहरांमधील कारभाराची दिशा ठरणार आहे. तर, आरक्षणाच्या (Reservation) मुद्यामुळे जिल्हा परिषद, पंचायत समितीची निवडणूक दोन टप्प्यात होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, जिल्हा परिषदेची निवडणूक (Zilla Parishad Election) आरक्षणाच्या मुद्द्यामुळे विलंबाने होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेची निवडणूक ही दोन टप्प्यात जाहीर केली जाऊ शकते. ५० टक्के आरक्षण न ओलांडलेल्या जिल्हा परिषद, पंचायत समितीची निवडणूक ही पहिल्या टप्प्यात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
असा असू शकतो महापालिका निवडणुकांचा संभाव्य कार्यक्रम
महापालिका निवडणुकांसाठी १५ जानेवारी रोजी मतदान होण्याची शक्यता आहे. तर, मतमोजणी १७ जानेवारी रोजी होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. विशेष म्हणजे सोमवारी किंवा शुक्रवारी मतदान झाल्यास नागरिक सुट्ट्या जोडून बाहेर पडतात आणि मतदानाची टक्केवारी घसरते, त्यामुळेच मधील कालावधीत मतदान घेण्याचा निर्णय होऊ शकतो. तर, १५ जानेवारीनंतरचा आठवडा हा २६ जानेवारी प्रजासत्ताक दिन (शु्क्रवार), चौथा शनिवार-रविवार असा लाँग वीकेंड असणार आहे. त्यामुळेच १५ जानेवारी मतदान होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
निवडणूक प्रक्रिया ३० दिवसांत पूर्ण केली जाणार
राज्यातील महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद आणि नगरपंचायत या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची प्रक्रिया घेण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला मुदतवाढ दिली होती. त्यानुसार राज्य सरकारला ३१ जानेवारी २०२६ पूर्वी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. त्यानंतर निवडणूक आयोगाकडून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची तयारी सुरु करण्यात आली होती. यातील नगपरिषदा आणि नगरपंचायतींच्या निवडणुकींसाठी मतदान झाले होते. तर काही तांत्रिक अडचणीमुळे उर्वरित नगपरिषदा आणि नगरपंचायतींच्या प्रभागांसाठी २० डिसेंबरला मतदान होईल आणि २१ डिसेंबरला मतमोजणी केली जाईल. त्यानंतर आज राज्य निवडणूक आयोगाकडून महापालिका निवडणुकांची घोषणा केली जाईल. त्यामुळे यंदाची निवडणूक प्रक्रिया फक्त ३० दिवसांत पूर्ण केली जाणार आहे.
या महानगरपालिकांच्या होणार निवडणुका
१) अहिल्यानगर महानगरपालिका
२) अकोला महानगरपालिका
३) अमरावती महानगरपालिका
४) भिवंडी निजामपूर महानगरपालिका
५) बृहन्मुंबई महानगरपालिका
६) चंद्रपूर महानगरपालिका
७) छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका
८) धुळे महानगरपालिका
९) इचलकरंजी महानगरपालिका
१०) जळगाव महानगरपालिका
११) जालना महानगरपालिका
१२) कल्याण डोंबिवली महानगरपालिका
१३) कोल्हापूर महानगरपालिका
१४) लातूर महानगरपालिका
१५) मालेगाव महानगरपालिका
१६) मीरा भाईंदर महानगरपालिका
१७) नागपूर महानगरपालिका
१८) नांदेड वाघाळा महानगरपालिका
१९) नाशिक महानगरपालिका
२०) नवी मुंबई महानगरपालिका
२१) पनवेल महानगरपालिका
२२) परभणी महानगरपालिका
२३) पिंपरी चिंचवड महानगरपालिका
२४) पुणे महानगरपालिका
२५) सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका
२६) सोलापूर महानगरपालिका
२७) ठाणे महानगरपालिका
२८) उल्हासनगर महानगरपालिका
२९) वसई-विरार महानगरपालिका





