नवी दिल्ली | New Delhi
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे (NCP SP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या हस्ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचा (मंगळवारी) महाजदी शिंदे राष्ट्र गौरव पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला. या सत्कार सोहळ्यावरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. तसेच शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शरद पवारांवरही टीका केली होती. मात्र, दिल्लीत एकनाथ शिंदे यांच्या सत्कार सोहळ्यावेळी ठाकरे गटाचा (Thackeray Group) एक खासदार देखील उपस्थित होता. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
ईशान्य मुंबईचे (North East Mumbai) ठाकरे गटाचे खासदार संजय दिना पाटील (MP Sanjay Dina Patil) हे एकनाथ शिंदेंच्या सत्कार सोहळ्याच्या कार्यक्रमाला उपस्थित होते. एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडखोरीनंतर उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये बेबनाव पाहायला मिळत आहे. त्यानंतर आता ठाकरे गटाचे खासदार संजय दिना पाटील यांनी या सोहळ्याला हजेरी लावल्याने ते कसे उपस्थित राहिले, याबाबत प्रश्न उपस्थित केला जात आहे. संजय दिना पाटील यांनी सोशल मीडियावर या सोहळ्याचे फोटो शेअर केल्यानंतर ही बाब समोर आली.
दरम्यान, हे फोटो समोर आल्यानंतर खासदार संजय दिना पाटील यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, “आपल्याला या सोहळ्याचे निमंत्रण असल्यामुळे आपण तिकडे गेलो होतो”, असे त्यांनी सांगितले. तसेच संजय दिना पाटील हे पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते. त्यामुळे त्यांची शरद पवार (Sharad Pawar) यांच्याशी जवळीक आहे. त्यामुळेच ते या कार्यक्रमाला गेले असावेत, असा अंदाज वर्तविला जात आहे.
डिनर डिप्लोमसीलाही ठाकरेंच्या खासदारांची हजेरी
एकीकडे या घडामोडी घडत असतानाच काल (गुरुवार) रात्री केंद्रीय राजमंत्री प्रतापराव जाधव यांच्या घरी सर्वपक्षीय खासदारांसाठी स्नेहभोजन ठेवण्यात आले होते. या स्नेहभोजनाला ठाकरेंच्या खासदारांनी हजेरी लावल्याचे बोलले जात आहे. यात ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय जाधव, खासदार नागेश पाटील आष्टीकर, खासदार भाऊसाहेब वाकचौरे उपस्थित असल्याची माहिती समोर आली आहे.