नाशिक | प्रतिनिधी | Nashik
२००९ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत (Vidhansabha Election) राज्यात १३ आमदार असलेल्या महाराष्ट्र निर्माण सेनेला २०१९ मध्ये फक्त एका आमदारावर समाधान मानावे लागले होते. तर नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत तर मनसेनेला एकही आमदार निवडून आणता आलेला नाही. तशीच काहीशी परिस्थिती शिवसेना ठाकरे गटाची देखील झाल्याची दिसत आहे. २०१९ साली ५० च्यावर आमदार निवडून आणलेल्या ठाकरे गटाला यंदा २० आमदारांवर समाधान मानावे लागत आहे. आता लवकरच मुंबई मनपासह राज्यातील सुमारे २० मनपा व १८ जिल्हा परीषदांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन विविध राजकीय पक्षांनी तयारीला सुरुवात केली असून या पार्श्वभूमीवर राज ठाकरे व उध्दव ठाकरे (Raj Thackeray and Uddhav Thackeray) एकत्र येणार असल्याची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे.
शिवसेनेत (Shivsena) २०२२ मध्ये मोठे बंड होऊन शिवसेना शिंदे गट निर्माण झाला. तर यंदाच्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या फक्त २० जागा आल्या आहेत. राज्यासह मुंबईत देखील शिवसेना ठाकरे गटाचे वजन कमी झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे या निकालानंतर तरी राज व उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावे, अशी दबक्या आवाजात मागणी जोर धरु लागली आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात कधी काय होईल हे सांगत येत नाही. मागच्या पंचवार्षीकमध्ये शिवसेना पक्ष फुटला व त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात देखील दोन गट निर्माण झाले. एकीकडे फोडाफ ोडीचे राजकारण सुरू असताना दुसरीकडे ठाकरे बंधूंनी एकत्र यावे, अशी साद घालण्यात येत आहे. असे झालेच तर महाराष्ट्राच्या राजकारणात आणखी एक मोठा भूकंप होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना पक्षाची स्थापना करून मुंबईच्या मराठी माणसाला मानसन्मान व एक दर्जा मिळवून दिला. त्यानंतर हळूहळू शिवसेनेची वाटचाल पुढे जात अवघ्या महाराष्ट्रात शिवसेनेच्या शाखा सुरू झाल्या.
मागील अनेक वर्षांपासून मुंबई महापालिकेत शिवसेनेची एकहाती सत्ता आहे. मात्र २००५ मध्ये काही कारणामुळे सेनेचे ज्येष्ठ नेते तथा बाळासाहेबांचे पुतणे राज ठाकरे यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र (Maharashtra) करत महाराष्ट्र नवनिर्माण सेना (MNS) पक्ष काढला. मनसेनेचा प्रवास देखील चढउतारचा राहिला आहे. सध्या पक्षाकडे एकही आमदार नाही व एकूण मतांचा टक्का देखील घसरला आहे. दुसरीकडे ठाकरेंच्या सेनेची अवस्था देखील पूर्वीसारखी दिसत नाही. त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर ठाकरे बंधू एकत्र येणार अशी चर्चा रंगू रंगू लाग लागली आहे.
सेना स्वतंत्र होणार?
शिवसेना ठाकरे गट सध्या महाविकास आघाडीचा घटक पक्ष आहे. तर मनसेना अधिकृतपणे महायुतीत नसली तरी भाजपशी त्यांची सध्यातरी जवळीत आहे. विधानसभा निवडणुकीनंतर ठाकरे गट महाविकास आघाडीतून बाहेर पडून स्वतंत्रपणे काम करणार असल्याची चर्चा आहे. मनसेना पुर्वीच स्वतंत्र असल्याने दोन्ही सेना एकत्र आल्या तर दोघांची शक्ती वाढणार असे देखील सांगण्यात येत आहे. महाविकास आघाडीचा प्रयोग झाल्यानंतर उद्धव ठाकरे २०१९ ला राज्याचे मुख्यमंत्री झाले होते. त्यांच्या शपथविधीला राज ठाकरे हजर होते. असे अनेक कौटुंबिक प्रसंग घडले आहेत. राज ठाकरे तसेच उद्धव ठाकरे एकत्रित आल्यास त्याचा परिणाम राज्यातील राजकारणावर मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता आहे.