मुंबई | Mumbai
लोकसभा निवडणुकीपासूनच ठाकरे गटाचे नेते आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांच्यामध्ये सातत्याने आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. त्यानंतर आता पुन्हा एकदा दानवे आणि खैरेंमधला वाद चव्हाट्यावर आला आहे. चंद्रकात खैरे यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी अनेक विषयांवर भाष्य करत अंबादास दानवे मोठा झाल्यासारखा वागतो. शिवसेना (Shivsena) मी वाढवली, हा काड्या करण्याचे काम करतो” असे म्हटले आहे.
विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी बोलावलेल्या पक्षाच्या मेळाव्याला खैरेंनी दांडी मारली होती. याविषयी आज माध्यमांनी खैरे यांना प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, “कालच्या पक्षाच्या कार्यक्रमाबाबत मला कुणी सांगितलं नव्हतं. या मेळाव्याबाबत अंबादासनेही मला काहीही सांगितलं नाही. आता तो स्वत:ला मोठा समजतो. तुम्ही काय आम्हाला कचरा समजता का? मी उद्धव साहेबांना याबद्दल सांगणार आहे, तक्रार करणार आहे. अंबादास मोठा झाल्यासारखा वागत आहे. मी सुरूवातीपासूनच शिवसेनेचा नेता आहे. शिवसेना मी वाढवली, लाठ्या काठ्या खाल्या. जेलमध्ये गेलो हा नंतर आला आणि काड्या करण्याचे काम करत आहे”, असे त्यांनी म्हटले.
ते पुढे म्हणाले की, “उद्धवजी संकटात असून, एकत्र येऊन काम करावे लागेल. कुणी गटबाजी करत असेल तर मला हे मान्य नाही. मी मरेल पण पक्ष सोडणार नाही, तरी काही लोक काड्या करत राहतात. अनेक जण कुठे-कुठे जातात कोण कसे अडजस्टमेंट करतात हे मला माहिती आहे. कार्यक्रम असा अचानक होतो का, मी स्वतः कार्यक्रमासाठी छोट्या मोठ्यांना फोन करतो. पक्ष मोठा करायचा दिलं सोडून आणि गटबाजी करतात, मी अजूनही काम करतो. काड्या करणं मला आवडत नाही. आणि मला कुणी काढूही शकत नाही. माझ्या पक्षासाठी मी काहीही करेल. मी माझं आंदोलन करणार, माझं आंदोलन (Agitation) माझ्या पक्षाचे आंदोलन असेल. तो करेल नाही तर नाही करेल, मला माहिती नाही”, असेही खैरे यांनी म्हटले.
अंबादास दानवे काय म्हणाले?
चंद्रकांत खैरे यांनी केलेल्या आरोपांवर बोलतांना अंबादास दानवे म्हणाले की, “खैरे ज्येष्ठ नेते आहेत त्यांना काय कारवाई करायची ती करू द्या”, असे प्रत्युत्तर त्यांनी दिले. त्यामुळे शिवसेना ठाकरे गटात नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.