मुंबई | Mumbai
गेल्या काही दिवसांपासून महायुतीमधील (Mahayuti) अनेक मंत्री आणि आमदार (MLA) विविध कारणांमुळे वादात सापडले आहेत. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे (Ajit Pawar NCP) मंत्री माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) हे नुकतेच रमी गेमवरून वादात सापडले होते. त्यावरून विरोधकांनी कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. मात्र, अजित पवारांनी त्यांना अभय दिल्याचे दिसून आले.
दुसरीकडे शिंदेंच्या शिवसेनेचे (Shinde Shivsena) मंत्री योगेश कदम, संजय शिरसाठ, भरत गोगावले हे देखील आपल्या अडचणीत सापडले आहेत. या सगळ्यामागे मित्रपक्षातील काही जण असल्याचा संशय शिंदेसेनेच्या नेत्यांना आहे. त्या पार्श्वभूमीवर शिंदे यांचा दिल्ली दौरा महत्त्वाचा आहे.या सर्व घडामोडींवरून महायुतीमध्ये सध्या कुरबुरी सुरु असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.
नुकतीच दोन दिवसांपूर्वी मंत्रिमंडळाची बैठक (Cabinet Meeting) पार पडली. या मंत्रिमंडळ बैठकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वादग्रस्त विधान करणाऱ्या मंत्र्यांची बैठक घेत त्यांचा चांगलाच क्लास घेतला. तसेच ‘यापुढे अशी कृत्य खपवून घेणार नाही, ही शेवटची संधी आहे, असे म्हणत त्यांनी या सर्व मंत्र्यांना तंबी दिली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) मित्रपक्षातील काही मंत्र्यांवर कारवाई करण्यासाठी आग्रही असल्यामुळे दोन दिवसांपासून राज्याच्या राजकीय वर्तुळात वेगवान घडामोडी सुरु असल्याचे दिसत आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे काल (बुधवारी) दिल्ली दौऱ्यावर गेले असून, त्यांनी शिवसेनेच्या खासदारांची आज बैठक घेतली. तसेच काल रात्री त्यांनी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेतल्याची देखील माहिती समोर आली आहे.
तर आज (गुरुवार) उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यासोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली. या तिघांमध्ये जवळपास २० मिनिटे चर्चा झाली. तर राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे यांनी देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सह्यादी अतिथीगृहावर भेट घेतली. मुंडे यांना कृषी साहित्य खरेदी प्रकरणात क्लीन चीट मिळाल्याने त्यांची मंत्रिमंडळात पुन्हा एन्ट्री होणार का? याची चर्चा या भेटीवरून सुरु झाली आहे.
मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे यांनी घेतली होती राज्यपालांची भेट
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्ली दौऱ्याआधी राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन (Governor C.P. Radhakrishnan) यांची राजभवन येथे भेट घेतली होती. त्यानंतर काल (बुधवारी) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपालांची भेट घेतली. या भेटीगाठींवरून राज्याच्या राजकीय वर्तुळात काहीतरी शिजतंय अशी चर्चा सुरु झाली आहे.





