मुंबई | उद्धव ढगे-पाटील | Mumbai
माणिकराव कोकाटे (Manikrao kokate) यांचे मंत्रिपद काढून घेणे राष्ट्रवादीला राजकीयदृष्ट्या परवडणारे नव्हते. कारण आधीच बीड जिल्ह्यातील नेते धनंजय मुंडे यांचा सरपंच हत्या प्रकरणात राजीनामा घ्यावा लागला आहे. त्यामुळे कोकाटेंचा राजीनामा घेतला असता तर महायुतीत राष्ट्रवादी (NCP) बळीचा बकरा ठरला असता. कोकाटेंच्या खात्यात बदल करून भाजपने शिंदे गटावर दबाव आणला होता.
निष्णात शिकाऱ्याने सावज टिपण्यासाठी रान उठवावे आणि प्रत्यक्षात हात हलवत जंगलातून बाहेर पडावे, अशी काहीशी अवस्था मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांची गेल्या आठवड्यात झाली. मंत्रिमंडळातील वादग्रस्त मंत्र्यांच्या बाबतीत घेतलेली भूमिका पाहता रान उठवले पण सावज निसटले, असे म्हणावे लागेल. फडणवीस हे कुशल राजकीय शिकारी आहेत. गेल्या दहा वर्षांत त्यांनी विरोधी पक्षातीलच नव्हे तर स्वपक्षातही अनेकांची बेमालूम राजकीय शिकार केली आहे. मंत्र्यांची वादग्रस्त विधाने आणि कृती अजिबात खपवून घेतली जाणार नाही, असे मंत्रिमंडळ बैठकीत ठणकावणारे फडणवीस आपल्या सरकारमधील वादग्रस्त मंत्र्यांना (Ministers) बाहेरचा रस्ता दाखवून झटका देतील, असे वाटत होते. मात्र त्यांच्याकडून ठोस कारवाई झाली नाही. उलट जी कारवाई झाली त्यात पक्षपातीपणा दिसून आला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाचे मंत्री माणिकराव कोकाटे यांच्याकडून ‘ओसाड गावची पाटीलकी’ काढून घेण्यात आली. परंतु कोकाटे यांच्यापेक्षा गंभीर आरोप असलेल्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दोन मंत्र्यांवर समज देण्यापलीकडे कारवाई झाली नाही. त्यामुळे आपल्या मंत्र्यांना वाचवून शिंदे यांनी फडणवीस यांच्यावर मात केली की महायुती सरकारच्या मर्यादांमुळे फडणवीस यांना शिंदेंच्या मंत्र्यांना हात लावता आला नाही, असा प्रश्न राजकीय वर्तुळाला पडला आहे.
गेल्या महिन्यात पार पडलेले राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन (Monsoon Session) माणिकराव कोकाटे, संजय शिरसाट आणि गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्यामुळे गाजले. अधिवेशन १८ जुलैला संपले आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी माणिकराव कोकाटे यांची भर सभागृहातील रमीचा डाव मांडल्याची चित्रफित समोर आली. ही चित्रफित सार्वजनिक करण्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) आघाडीवर होते. सुरुवातीला माणिकराव कोकाटे यांनी खुलासा करून स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर आणखी काही चित्रफिती समोर आल्यानंतर त्याची दखल मुख्यमंत्र्यांना आणि कोकाटेंच्या पक्षाला घ्यावी लागली. सुरुवातीला कोकाटे यांना समज दिली जाईल, असे वाटत होते. कारण मंत्रिमंडळ बैठकीत फडणवीस यांनी मंत्र्यांना फैलावर घेताना ही शेवटची संधी असल्याचा निर्वाणीचा इशारा दिला होता. त्यामुळे कोकाटेच नव्हे तर शिरसाट आणि कदम यांच्यावरील संकट टळल्याचे संकेत मिळत होते.
मात्र कोकाटे यांची चित्रफित पार दिल्लीतील भाजप नेत्यांच्या हातात पडल्याने उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना कारवाई करण्यास भाग पाडण्यात आले. कोकाटे यांचे मंत्रिपद काढून घेणे राष्ट्रवादीला राजकीयदृष्ट्या परवडणारे नव्हते. कारण आधीच बीड जिल्ह्यातील नेते धनंजय मुंडे यांचा सरपंच हत्या प्रकरणात राजीनामा घ्यावा लागला आहे. त्यामुळे कोकाटेंचा राजीनामा घेतला असता तर महायुतीत राष्ट्रवादी बळीचा बकरा ठरला असता. त्यामुळे कोकाटेंच्या खात्यात बदल करून भाजपने शिंदे गटावर दबाव आणला होता. परंतु एकनाथ शिंदे यांनी भाजप श्रेष्ठींशी असलेल्या संबंधांच्या जोरावर हा दबाव झुगारून लावला.
खरेतर माणिकराव कोकाटे यांच्या कृतीपेक्षा सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट आणि राज्यमंत्री योगेश कदम यांच्यावरील आरोप हे अधिक गंभीर स्वरुपाचे होते. कारण या दोघांच्या आरोपात चौकशीची संधी होती. आरोपांची सत्यता पडताळता आली असती. शिरसाट यांच्यावर मुलाच्या कंपनीमार्फत संभाजीनगरमधील हॉटेल (Hotel) खरेदीसाठी नियमबाह्य लिलाव प्रक्रिया राबवण्यात आल्याचा आरोप झाला. त्यापाठोपाठ शिरसाट यांची घरातील चित्रफित बाहेर आली. या चित्रफितीत दिसत असलेल्या बॅगा पैशांनी भरलेल्या असल्याचा दावा केला जात आहे. या बॅगांबद्दल शिरसाट यांनी खुलासा केला असला तरी तो फारसा पटणारा नाही. त्यामुळे शिरसाट हे भाजपच्या रडारवर होते. तर योगेश कदम यांच्या आईच्या नावे परवाना असलेल्या मुंबईतील बारमध्ये मुली नाचवल्या जात असल्याचा आणि या बारवर पोलिसांनी धाड घालून बारबाला पकडल्याचा आरोप झाला.
शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे आमदार अनिल परब (MLA Anil Parab) या प्रकरणाचा पाठपुरावा करत आहेत. परब यांना कदम यांच्या विरोधातील ही माहिती मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावरून देण्यात आल्याचा दाट संशय शिंदे गटाला आहे. योगेश कदम यांनी मध्यंतरी पनवेल परिसरातील बारवर धाड टाकली होती. ही बाब फडणवीस यांना फारशी रुचली नव्हती त्यामुळे योगेश कदम यांच्याशी संबंधित बारवर पोलिसांची धाड पडणे हा योगायोग मानता येणार नाही. वरिष्ठांकडून पाठबळ असल्याशिवाय पोलीस गृहराज्यमंत्र्यांचा संबंध असलेल्या बारवर धाड घालण्याचे धाडस करणार नाहीत. अशावेळी शिरसाट आणि कदम यांच्या विरोधात ठाकरे गट आक्रमक झाल्याने आपल्या मंत्र्यांचा बचाव करण्यासाठी उपमुख्यमंत्री शिंदे यांना पुढे यावे लागले. मुख्यमंत्री फडणवीस वादग्रस्त मंत्र्यांवर कारवाई करण्यासाठी किंवा त्यांच्या मागे चौकशीचे शुक्लकाष्ठ लावण्याच्या निर्णयाप्रत आल्याची कुणकूण लागल्यानंतर शिंदे यांनी दिल्ली गाठत आपल्या मंत्र्यांची बाजू मांडली. त्यामुळे शिंदे यांच्या मंत्र्यांवर कारवाई होता होता राहिली. तरीही ठाकरे गटाने योगेश कदम यांच्याविरोधात पुरावे सादर करायला सुरुवात केल्याने त्यांच्या डोक्यावर कारवाईची टांगती तलवार कायम आहे.
भाजपची स्वबळाच्या दिशेने वाटचाल
पंधराव्या विधानसभेत १३२ आमदार निवडून आणणाऱ्या भाजपच्या राजकीय महत्त्वाकांक्षा आता वाढल्या आहेत. राज्यात पक्षविस्तार विरोधी पक्षातील नेत्यांना आयात करून सुरू आहे. अगदी भाजपच्या संघर्षाच्या काळात पक्षात काम केलेले आणि नंतर पक्ष सोडून गेलेले नेते भाजपमध्ये घरवापसी करू लागले आहेत. अशा जुन्या जाणत्या नेत्यांपैकी एक म्हणजे अण्णा डांगे यांनी गेल्या आठवड्यात भाजपचा झेंडा हातात घेतला. डांगे यांनी दिवंगत प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे यांच्यासोबत काम केले आहे. भाजपच्या ‘माधव’ (माळी, धनगर आणि वंजारी) समीकरणात डांगे यांचा समावेश आहे. १९९५ च्या पहिल्या युती सरकारच्या मंत्रिमंडळात डांगे मंत्री होते. अण्णा आपल्या मुलांचे राजकीय भवितव्य अजमावू पाहत आहेत. सध्या भाजपकडे गोपीचंद पडळकर हा सांगलीतील धनगर चेहरा आहे. त्यामुळे डांगे कुटुंबाला भाजपमध्ये पूर्वीसारखी संधी मिळणे अवघड आहे. सुरेश वरपुडकर आणि कैलास गोरंट्याल या मराठवाड्यातील काँग्रेसच्या दोन माजी आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला. गोरंट्याल यांनी भर विधानसभेत शिंदे गटाला उद्देशून पहिल्यांदा ‘५० खोके, एकदम ओके’ ही घोषणा दिली होती. याआधी भाजपने भोरच्या संग्राम थोपटे आणि धुळ्याच्या कुणाल पाटील या काँग्रेसच्या दोन माजी आमदारांना पक्षात घेतले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घोषित होईपर्यंत भाजपमध्ये हा पक्षप्रवेशाचा सिलसिला सुरू राहणार आहे. त्यामुळे विरोधी पक्षासमोर गळती रोखण्याचे आणि भाजपशी (BJP) दोन हात करण्याचे दुहेरी आव्हान निर्माण झाले आहे.





