मुंबई | Mumbai
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (Shivsean UBT) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackaray) यांच्या ‘शिवतीर्थ’ या निवासस्थानी जाऊन गणरायाचे दर्शन घेतले. यावेळी उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackaray) सहकुटुंब जेवण देखील केले. यानंतर ते मातोश्री या आपल्या निवासस्थानी रवाना झाले. त्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरेंच्या निवासस्थानी जाऊन गणपती बाप्पाचे दर्शन घेतले. त्यामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चांना उधाण आले आहे.
मुंबईतील बेस्ट पतपेढी निवडणुकीत (Election) ठाकरे बंधूंचा (Thackaray Brothers) दारुण पराभव झाल्यानंतर बुधवारी (दि.२१ ऑगस्ट) राज ठाकरेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. या भेटीदरम्यान दोघांमध्ये जवळपास अर्धा तास चर्चा झाली. त्यानंतर आठवड्याभरातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) व मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची ही दुसरी भेट झाली आहे.
राज ठाकरे यांच्या निवासस्थानी दीड दिवसांचा गणपती (Ganpati Bappa) असतो. त्यामुळे दरवर्षी अनेक राजकीय नेतेमंडळी राज ठाकरेंच्या निवासस्थानी गणपतीच्या दर्शनासाठी हजेरी लावतात. मात्र, यंदा पहिल्यांदाच उद्धव ठाकरेंनी सहकुटुंब दर्शनासाठी हजेरी लावल्याने तो चर्चेचा विषय ठरला आहे.
दरम्यान, गेल्या वर्षी देखील देवेंद्र फडणवीस हे राज ठाकरे यांच्या निवासस्थानी गणरायाच्या दर्शनासाठी गेले होते. राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीगाठी होत असतात.मात्र, सध्याच्या स्थितीत या भेटीगाठींना विशेष महत्त्व आहे. कारण आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत. या निवडणुकांमध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची युती होण्याची शक्यता आहे. पण असं असताना राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात जवळीक वाढताना दिसत आहेत.




