बारामती | Baramati
राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचं काल (बुधवारी) सकाळी ८.४५ च्या सुमारास वयाच्या ६६ व्या वर्षी बारामतीमध्ये एका भीषण विमान अपघातात मृत्यू झाला. त्यांच्या अकाली निधनामुळे पवार कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, संपूर्ण महाराष्ट्र शोकसागरात बुडाला आहे.
त्यानतंर उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावर आज (दि.२९ ) रोजी बारामतीमधील विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. मुलगा पार्थ पवार आणि जय पवार यांनी अंत्यसंस्काराआधी धार्मिक विधी आणि पूजा केली. यानंतर पत्नी सुनेत्रा पवार यांनी त्यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले. त्यानंतर दोन्ही मुलांनी अजित पवारांना मुखाग्नी दिला.
दरम्यान, अजित पवारांच्या अंत्यसंस्कारासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, यांच्यासह दिग्गज नेते उपस्थित होते.
दिग्गजांनी अजित पवारांना वाहिली आदराजंली
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, प्रतापराव जाधव, मुरलीधर मोहोळ,रक्षा खडसे गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासाह राज्य मंत्रिमंडळातील मंत्र्यांनी अजित पवारांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करून त्यांना आदराजंली वाहिली.
कार्यकर्त्यांचा आक्रोश, ‘अजित पवार अमर रहे’ च्या दिल्या घोषणा
अजित पवारांना अखेरचा निरोप देण्यासाठी विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर मोठ्या प्रमाणावर जनसमुदाय जमला होता. यावेळी अंत्यसंस्काराची तयारी सुरू असताना ‘परत या परत या अजितदादा परत या, अजित पवार अमर रहे अशा घोषणा कार्यकर्त्यांकडून देण्यात आल्या.





