बीड | Beed
येथील सावरगाव घाट येथे भाजपच्या नेत्या आणि मंत्री पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांचा दसरा मेळावा (Dasara Melava) पार पडला. यावेळी पंकजा मुंडे सकाळी ११ वाजता हेलिकॉप्टरने मेळाव्याच्या ठिकाणी दाखल झाल्या. त्यानंतर त्यांनी राष्ट्रसंत भगवान बाबा यांच्या मंदिरात जाऊन दर्शन घेत पूजा व आरती केली. पंकजा मुंडेंच्या या मेळाव्यास राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते धनंजय मुंडे (Dhananjay Munde) आणि लक्ष्मण हाके (Laxman Hake) यांनी देखील हजेरी लावली. यावेळी धनंजय मुंडे यांनी आपल्या भाषणात विविध मुद्द्यांवर भाष्य केले.
यावेळी बोलतांना धनंजय मुंडे (Dhananjay Munde) म्हणाले की, “२५० दिवस माझी वाईट मानसिकता झाली होती. माझी बहीण माझ्याजवळ येऊन तास न् तास बसत होती. ज्या काळात मीडिया ट्रायल सुरू होते, त्यावेळी माझ्या बहिणीने आधार दिला. माझ्या पक्षाच्या महायुतीच्या नेत्यांनी आधार दिला. माझ्या विरोधात घोटाळा काढला. कोर्टात गेले. कोर्टाने मला क्लीनचिट दिली. जे कोर्टात गेले. त्यांना लाख रुपयाचा दंड ठोठावला. एवढं होऊनही मी आज शिक्षा भोगत आहे हे लक्षात घ्या”, असे त्यांनी म्हटले.
पुढे ते म्हणाले की, “आज शेतकरी अडचणीत असून, याठिकाणी आलेला प्रत्येकजण शेतकरी आहे, आज मी मंत्रिमंडळात नाही, फक्त आमदार आहे. माझी बहिण मंत्रिमंडळात आहे, शेतकऱ्यांच्या शेवटच्या टोकापर्यंत शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत पंकजा मुंडे मिळवून दिल्याशिवाय राहणार नाहीत”, असंही धनंजय मुंडेंनी सांगितले.
तसेच “दसऱ्याच्या मेळाव्याची (Dasara Melava) परंपरा जे फक्त घोषणा द्यायला आले त्यांना मेळावा कधी सुरू झाला, मेळावा कुणी सुरू केला काही माहिती नाही. भगवान गडाच उद्घाटन स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांनी मुख्यमंत्री असताना दसऱ्याच्या दिवशी सुरू केलं. त्या दिवसापासून या दसऱ्याची परंपरा आहे, आजही डोळ्यात पाणी येत की, स्वर्गीय मुंडे साहेबांनी हा दसरा मेळावा जगाच्या नकाशावर नेला”, असंही धनंजय मुंडेंनी सांगितले.
आरक्षणाबाबत धनंजय मुंडे काय म्हणाले?
मराठा समाजाला आरक्षण दिलं. आम्हाला आनंद आहे. कारण मराठा आंदोलनाच्या चळवळीत आम्ही होतो. पण काही लोकांना आरक्षणाच्या आड राहून ओबीसीतून आरक्षण घ्यायचे आहे. एक उदाहरण सांगतो, ओबीसींचे आता आलेला एमपीएसीचा कट ऑफ होता ४८५ होता. स्पेशल विकरचा कट ऑफ ४५० होता. मला कोणतंच आरक्षण नसेल. मी विकर सेक्शनमध्ये अर्ज भरला असता तर ४५० मार्कात आत गेलो असतो. पण ओबीसीत आल्यावर ४८० मार्क घेऊनही नापास आहे. कुणाला फसवता. काही लोक राजकारण करत आहे. सरकारने आरक्षणासाठी जे करायचं ते केलं आहे. आताही करत आहे. आरक्षण दिलं आणखी द्या. काही म्हणणे नाही. पण याच्या ताटातून काढून त्या ताटात देऊ नका”, असेही धनंजय मुंडे म्हणाले.
शेरो शायरीने वेधलं लक्ष
धनंजय मुंडेंनी आजच्या भाषणात एका शायरीने सगळ्यांचे लक्ष वेधले. यामध्ये ‘आग लगी थी मेरे घर, सब पुछने वाले आये हाल पूछा और चले गये…, एक सच्चे मित्र ने पूछा क्या बचा है? मैने कहाँ कुछ नहीं केवल मैं बचा गया हूँ…, फिर उसने गले लगा कर कहाँ दोस्त…, फिर जला ही क्या हैं?, अशी शायरी त्यांनी बोलावून दाखवली.




