मुंबई | Mumbai
मराठा आंदोलक मनोज जरांगे आणि राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) हे मराठा आरक्षणाचा जीआर (Maratha Reservation GR) निघाल्यापासून सातत्याने एकमेकांवर टीका करत आहेत. अशातच आजच्या पत्रकार परिषदेत जरांगे यांनी ओबीसींचा खरा घात कोणी केला असेल तर तो येवल्याच्या अलिबाबांनी (छगन भुजबळ) आणि काँग्रेसच्या पूर्वीच्या नेत्यांनी केला. तसेच ओबीसींची खरी फसवणूक, वाटोळं ओबीसी नेत्यांनीचं केलं, असे म्हटले होते. त्यावर भुजबळांनी प्रत्युत्तर देत जरांगेंवर हल्लाबोल केला आहे.
यावेळी बोलताना भुजबळ म्हणाले की, “सारखं काय जरांगे-जरांगे करता, त्याचा अभ्यास किती? शिक्षण किती? आपण उगाच त्याला डोक्यावर घेत असून, तो काही मराठ्यांचा नेता नाही. मराठयांचे नेते यशवंतराव चव्हाण, शरद पवार, एकनाथ शिंदे, पृथ्वीराज चव्हाण, अजित पवार हे आहेत. त्यांनी महाराष्ट्रातील सगळ्या घटकांना सोबत घेऊन जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, जरांगे हे त्या ठिकाणचे वाळू चोर असून, दारूचे धंदे करणाऱ्यांचा नेता आहे. तो महाराष्ट्राचा आणि मराठा समाजाचा नेता नाही, असे म्हणत त्यांनी मनोज जरांगेंवर (Manoj Jarange) हल्लाबोल केला.
लाडकी बहीण योजनेचा मोठा फटका
भुजबळ आजच्या पत्रकार परिषदेत म्हणाले की, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा खर्च ३५ ते ४० कोटींवर जाते. तेवढे पैसे आपल्याला काढायचे म्हटले की, सगळीकडेच याचा फटका बसतो. त्यातच राज्यात झालेल्या पाऊसामुळे शेतीची प्रचंड मोठी हानी झाली, त्यामुळे तिकडे देखील मोठ्या प्रमाणावर निधी द्यावा लागणार आहे. निश्चितपणे यामुळे निधीची ओढाताण होत राहणार आहे. लाडकी बहीण योजनेमुळे इतर गोष्टींना फटका बसत आहे. इतर काही गोष्टी करणे शक्य नाही, असेही त्यांनी म्हटले.
यंदा आनंदाचा शिधा मिळणार नाही!
शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून त्यांना अगोदर मदत करणे आवश्यक आहे. यासोबतच लाडकी बहीण योजनेचा फटका इतर विभागांना बसत आहे. आमच्या विभागातर्फे दहा किलो तांदूळ आणि गहू वाटप केला जात असून, ते वाटप आम्ही सुरू केलं आहे. ज्यांच्या घरामध्ये पाणी शिरले, त्यांना सरकार पाच हजार रूपये मदत देतं आहे. बाकी पंचनामे करून भारत सरकार निश्चितपणे मदत करणार आहे, असे भुजबळ यांनी म्हटले. त्यामुळे यंदा दिवाळीच्या पार्श्वभूमीवर आनंदाचा शिधा मिळणार नसल्याचे बोलले जात आहे.




