मुंबई | Mumbai
शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांची पुन्हा एकदा मुंबईतील एका लग्नसोहळ्यात भेट झाली आहे. यावेळी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकमेकांशी संवाद साधला. याप्रसंगी उद्धव ठाकरे यांच्यासोबत रश्मी ठाकरे देखील उपस्थित होत्या.
राज ठाकरे, उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे (Rashmi Thackeray) लग्नात भेटल्यानंतर तिघेही गप्पा मारताना दिसले. तिघांमध्ये चांगलाच हास्यविनोद रंगला होता. तिघेही एकाच फ्रेममध्ये आल्यानंतर कॅमेरामनची फोटो काढण्यासाठी एकच तारांबळ उडाली. तिघांचीही हास्यविनोद करतानाची छबी कॅमेऱ्यात कैद करण्यासाठी कॅमेरामन सरसावले होते. क्षणार्धात कॅमेऱ्याचा किलकिलाट सुरू झाला. मात्र, तिघांनीही कॅमेऱ्यांकडे न पाहता गप्पा मारणे सुरूच ठेवले होते. त्यामुळे आता दोन्ही बंधू मराठी माणसांसाठी एकत्र येणार का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
दरम्यान, विधानसभा निवडणुकीनंतर (Vidhansabha Elections) राज आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र येण्यासाठी पुण्यापासून मुंबईपर्यंत बॅनरबाजी सुरू झाली होती. ठाकरे बंधूनी एकत्र यावं म्हणून अगोदर पुण्यात बॅनर लावण्यात आले होते. त्यानंतर मुंबईतील शिवसेना भवन येथे बॅनर लावण्यात आले होते. यापूर्वी मनसे नेते बाळा नांदगावकर आणि संदीप देशपांडे यांनी दोन्ही ठाकरे बंधूंना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला होता. पण त्यात त्यांना यश आले नव्हते.