मुंबई | Mumbai
गेल्या काही महिन्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे (NCP Sharad Pawar) अध्यक्ष शरद पवार आणि राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार (Ajit Pawar) यांच्यात बैठकांवर बैठक झाल्या आहेत. त्यामुळे पवार काका-पुतणे पुन्हा एकदा एकत्र येणार का? याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. अशातच आता शरद पवार यांनी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीत मोठे विधान केले आहे. यावरून शरद पवारांची राष्ट्रवादी महाविकास आघाडीतून (Mahavikas Aaghadi) बाहेर पडणार का? असाही सवाल उपस्थित होत आहे.
मुलाखतीत शरद पवार म्हणाले की, “आमच्या पक्षातील एका गटाचा मतप्रवाह उपमुख्यमंत्री (DCM) अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेससोबत जावं, असा आहे. मात्र, एकत्र येण्यासंदर्भात सुप्रिया सुळे (Supriya Sule) आणि अजित पवार यांनी बसून ठरवावे. पक्ष उभा करताना आज बाजूला गेलेले सगळे एकत्र होते, त्यांच्या सगळ्यांची विचारधारा एकच आहे, त्यामुळे भविष्यात जर हे सगळे एकत्र आले तर मला आश्चर्य वाटणार नाही. तसेच केंद्रात (Central) विरोधी पक्षात बसायचे की नाही, याचा निर्णय सुप्रिया सुळे यांना घ्यावा लागेल, असेही त्यांनी म्हटले.
पुढे ते म्हणाले की, “माझे सगळे खासदार (MP) एक मताचे आहेत, आमदारांमध्ये अस्वस्थता असू शकते, मी निर्णय प्रक्रियेपासून खूप लांब आहे, पक्षात भाकरी फिरवण्याचा निर्णय हा जयंत पाटलांनी घ्यावा. राज्यातील आमच्या काही आमदारांना असे वाटते की, मतदारसंघातील विकासकामे करून घेण्यासाठी अजित पवारांसोबत गेले पाहिजे, पण याबाबतचा निर्णय हा मी देणार नाही, त्यांनी तो निर्णय एकत्र बसून घ्यावा”, असेही शरद पवार यांनी म्हटले.
ते पुढे म्हणाले की,”जनतेला मोदींना पर्याय हवा आहे, पण विरोधक तो देऊ शकलेले नाहीत. अनेक जण प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष भाजपासोबत (BJP) न जाण्याची भूमिका मांडत इंडिया आघाडीसोबत कायम राहण्याचे मत मांडत आहेत. परंतु, इंडिया आघाडी सध्या सक्रीय नाही. त्यामुळे आम्हाला संघटनेसोबत पक्ष पुन्हा उभा करावा लागणार आहे. युवकांना सोबत घेऊन काम करावे लागणार आहे असे शरद पवारांनी म्हटले. तसेच आमचा विचार विरोधी पक्षात काम करण्याचा आहे. आपण भाजपला एक विश्वासार्ह पर्याय निर्माण केला पाहिजे”, अशी भूमिकाही शरद पवार यांनी मांडली.