Wednesday, April 22, 2026
Homeब्रेकिंग न्यूजMaharashtra Politics : "...तर आम्ही राजीनामा देऊ"; DCM शिंदेंसमोर शिवसेना आमदारांचा रुद्रावतार;...

Maharashtra Politics : “…तर आम्ही राजीनामा देऊ”; DCM शिंदेंसमोर शिवसेना आमदारांचा रुद्रावतार; नेमकं घडलं तरी काय?

मुंबई | Mumbai

सातारा जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपने शिवसेना आणि राष्ट्रवादी या आपल्याच मित्रपक्षांना धोबीपछाड दिली. त्यामुळे यानिमित्ताने सत्ताधारी महायुतीत जुंपल्याचे बघायला मिळाले. शिंदे सेनेचे मंत्री शंभूराज देसाई यांनी संख्याबळ नसूनही भाजपने रडीचा डाव खेळत आपला अध्यक्ष बसवला. त्यासाठी पोलीस अधिक्षकांनी मदत केल्याचा आरोप केला. यानंतर आज (सोमवारी) विधिमंडळ अधिवेशनात याचे पडसाद उमटले. देसाई यांनी विधान परिषदेत सभापती नीलम गोऱ्हे यांच्याकडे पोलीस अधिक्षकांना निलंबित करण्याचे आदेश दिले. तर विधानसभेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आक्रमक होत राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच सदस्यांना मतदान करू न दिल्याचा प्रकार घडला असून लोकशाही गळा घोटण्याचं काम साताऱ्यात पोलीस प्रशासनाकडून करण्यात आलं आहे, अशा शब्दांत आपला संताप व्यक्त केला. शिंदेंच्या आक्रमक भूमिकेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत भूमिका मांडत चौकशी करून योग्य ती कारवाई केली जाणार असल्याचं आश्वासन दिले.

- Advertisement -

यावेळी शिंदे म्हणाले की,”शंभूराज देसाई यांनी सातारा जिल्हा परिषद निवडणुकीबाबतची घटना सांगितली. या घटनेचा मी देखील साक्षीदार आहे. कारण जिल्हा परिषद निवडणूक जाहीर झाल्यानंतर शंभूराज देसाई यांनी मला फोन केला होता. त्यांनी सांगितलं की, दोन सदस्यांवर ५-१० वर्षांपूर्वीच्या एका प्रकरणात आता गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि त्यांना अटक केली जाणार आहे. ही माहिती मिळाल्यानंतर मी साताऱ्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांना फोन केला आणि सांगितलं की, हा काय प्रकार आहे? त्यावर दोशी यांनी सांगितलं की, हा गुन्हा दाखल झालाय, पण आपण त्यांच्यावर नंतर कारवाई करू. मी त्यांना म्हणालो की, उद्या मतदान आहे आणि आपल्याला कोणालाही मतदानापासून वंचित ठेवता येत नाही. कोर्टही अनेकदा मतदानासाठी गुन्हा दाखल असलेल्या आरोपींना परवानगी देतं. त्यामुळे या दोन सदस्यांना मतदानापासून वंचित ठेवता येणार नाही, मतदान झाल्यानंतर दाखल गुन्ह्याप्रकरणी काय कार्यवाही करायची, ती करा, असं मी सांगितलं. त्यावर पोलीस अधीक्षकही म्हणाले की, मी त्यांना मतदानापासून वंचित ठेवणार नाही. त्यानंतर मी आपले पोलीस महासंचालक सदानंद दाते यांनाही फोन केला आणि याबाबत सांगितलं. बहुमत हे शंभूराज देसाई आणि मकरंद पाटील यांच्याकडे आहे, त्यामुळे ही दोन मतं कमी करण्यासाठी या लोकांकडून वेगळा प्रकार होऊ शकतो, असं मी दाते यांना सांगितलं. त्यानंतर दाते यांनी साताऱ्याच्या पोलीस अधीक्षकांना फोन करून दोन्ही सदस्यांना मतदान करू देण्याच्या सूचना केल्या. मात्र तरीही मतदानाच्या दिवशी सदस्यांना मतदानापासून रोखण्यासाठी पोलीस तिथे थांबले होते,” असा दावा त्यांनी केला.

तर आम्ही राजीनामा देऊ…

अधिवेशनात सातारा निवडणुकीचे पडसाद उमटल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दालनात शिवसेनेच्या आमदारांनी बैठक झाली. या बैठकीत शिवसेनेचे आमदार संतप्त झाले. तसेच त्यांनी सत्ताधारी मंत्री आणि आमदारांना मिळणारी दुय्यम वागणूक न खपणारीच असल्याचं सांगितले. तर आम्ही राजीनामा देऊ अशी भूमिका शिवसेना मंत्र्यांनी एकनाथ शिंदेच्या समोर बोलून दाखवली. सातत्याने आमची गळचेपी होत आहे यावर बोललं पाहिजे असे आमदार आणि मंत्र्यांनी म्हटल्याचे बोलले जाते. तर भाजपचे आमदार आणि मंत्र्‍यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दालनात बैठक पार पडली

सातारा एसपीच्या निलंबनाचे आदेश

सातारा जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये झालेल्या राड्यानंतर विधानपरिषदेत मंत्री शंभूराजे देसाई यांनी प्रश्न उपस्थित केला. त्यानंतर उपसभापति नीलम गोऱ्हे यांनी सातारा पोलीस अधीक्षक तुषार दोषी यांच्या निलंबनाचे आदेश दिले. पुण्याच्या विभागीय आयुक्तांना लक्ष घालून चौकशीचे आदेश दिले आहेत. विधानपरिषदेमध्ये सातारा जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये झालेल्या राड्यावरून शिवसेना नेते चांगलेच आक्रमक झाल्याचे दिसून आले.

मुख्यमंत्री काय म्हणाले?

एकनाथ शिंदे यांनी साताऱ्यातील घटनेवरून नाराजी व्यक्त केल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भूमिका मांडली, “अध्यक्ष महोदय, सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, यांनी जी वस्तुस्थिती सांगितली आहे, त्या वस्तुस्थितीच्या आधारावर या संपूर्ण प्रकरणाची चौकशी केली जाईल आणि या चौकशीच्या आधारे योग्य ती कारवाई केली जाईल,” असं मुख्यमंत्री म्हणाले.

ताज्या बातम्या

Rahata : कल्पना खरातचा अटकपूर्व जामीन अर्ज राहाता न्यायालयाने फेटाळला

0
राहाता |प्रतिनिधी| Rahata अशोक खरात (Ashok Kharat) प्रकरणातील महत्त्वाची दुवा मानली जाणारी त्याची पत्नी कल्पना खरात (Kalpana Kharat) हिचा अटकपूर्व जामीन (Anticipatory Bail) अर्ज राहाता...