नाशिक, दि. १९ ऑगस्ट (जिमाका वृत्तसेवा)
नाशिक त्र्यंबकेश्वर येथे पुढील वर्षी सिंहस्थ कुंभमेळा होत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा वार्षिक योजनेच्या माध्यमातून होणारी विविध विकास कामे युद्ध पातळीवर पूर्ण करावीत, असे निर्देश जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातील नियोजन सभागृहात आज सायंकाळी जिल्हा नियोजन समितीची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह, महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री, जिल्हाधिकारी तथा जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सचिव आयुष प्रसाद, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार, पोलिस अधीक्षक डॉ. डी. एस. स्वामी, जिल्हा नियोजन अधिकारी विजय शिंदे, पोलिस उपायुक्त चंद्रकांत गवळी, निवासी उपजिल्हाधिकारी रोहितकुमार राजपूत आदी उपस्थित होते.
पालकमंत्री महाजन म्हणाले की, आगामी कुंभमेळ्यासाठी देशविदेशातून कोट्यवधी भाविक येण्याची शक्यता आहे. या भाविकांसाठी पायाभूत सुविधांचे बळकटीकरण करून विविध सोयीसुविधा पुरविण्यात येणार आहेत. त्यासाठी ३५ हजार कोटी रुपयांचा निधी खर्च होणार आहे. आगामी कुंभमेळा स्वच्छ, सुंदर, पर्यावरणपूरक आणि सुरक्षित होईल, असे नियोजन करण्यात आले आहे. अशा परिस्थितीत जिल्हा वार्षिक योजनेची कामे वेळेत पूर्ण करावीत. जिल्ह्यातील विकास कामांसाठी पुरेसा निधी उपलब्ध आहे. जिल्हा वार्षिक योजनेचा सविस्तर आढावा घेण्यासाठी लवकरच बैठक होईल.
नाशिक शहरातील रस्त्यांचे काँक्रिटीकरण करतानाच विविध सुविधा करण्यात येत आहेत. ही सर्व कामे वेळेआधीच पूर्ण होतील. ही सर्व कामे गुणवत्तापूर्ण, दर्जेदार होतील याचीही दक्षता बाळगावी. कोणत्याही कामात दिरंगाई खपवून घेतली जाणार नाही, असेही पालकमंत्री महाजन यांनी सांगितले.
यावेळी पालकमंत्री महाजन यांच्या हस्ते मुख्यमंत्री महोदयांनी दिलेले प्रशस्तीपत्र जिल्हाधिकारी प्रसाद यांना प्रदान करण्यात आले. तसेच ‘महास्ट्रॉइड’ अंतर्गत प्राप्त ८ कोटी रुपयांच्या निधीचा धनादेश जिल्हा नियोजन अधिकारी शिंदे यांना प्रदान करण्यात आला. तसेच पोलीस दलास देण्यात येणा-या वाहनांच व विविध कार्यदेशांचे वितरण पालकमंत्री महाजन यांच्या हस्ते करण्यात आले.
जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी प्रास्ताविक केले. त्यांनी जिल्हा वार्षिक योजनेच्या माध्यमातून होणाऱ्या विविध कामांची माहिती दिली. तसेच ही सर्व कामे वेळेत पूर्ण होतील, अशी ग्वाही त्यांनी दिली. यावेळी खासदार राजाभाऊ वाजे, आमदार गोकुळ गीते, आमदार मुफ्ती मोहम्मद इस्माईल, आमदार डॉ. राहुल आहेर, आमदार सरोज अहिरे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते .




