मुंबई | Mumbai
आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या (Local Body Election) पार्श्वभूमीवर आज (गुरुवारी) शिवसेनेच्या दोन्ही गटांचा (Shivsena Group) स्वतंत्र दसरा मेळावा होत आहे. या मेळाव्यात दोन्ही गटांकडून महापालिका निवडणुकीचे रणशिंग फुंकले जाण्याची शक्यता आहे.
गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर (Vidhansabha Election) हा पहिलाच मेळावा असून या मेळाव्यात उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि एकनाथ शिंदे (Eknath Shinde) या दोन्ही माजी मुख्यमंत्र्यांमध्ये पुन्हा आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडण्याची शक्यता आहे. दोन्ही गटांसाठी मुंबई महापालिकेची निवडणूक अतिशय महत्त्वाची आहे. त्यामुळे दोन्ही गटांचे आजच्या मेळाव्यांकडे लक्ष लागले आहे. ठाकरे गटाने पावसाला न जुमानता शिवाजी पार्कवर मेळावा घेण्याचा निर्धार केला आहे. तर शिंदे शिवसेनेचा गोरेगावच्या नेस्को मैदानात मेळावा होत आहे.
दरम्यान, बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांनी शिवसेना (Shivsena) ही गुढीपाडवा, दसरा, अक्षय्यतृतीया हे मुहूर्त पाहून स्थापन केली नव्हती. त्याच्यामुळे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या राजकीय युतीची घोषणा ज्या दिवशी होईल, त्या दिवशी मराठी संस्कृती आणि मराठी राजकारणातील तो साडेचारावा मुहूर्त असेल. मुहूर्ताचा एक वेगळा दिवस त्या दिवशी निर्माण होईल. असे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी म्हटले होते.
मनसेसोबत युतीची घोषणा होणार?
आजच्या दसऱ्या मेळाव्यात मनसेसोबतच्या (MNS) युतीवर उद्धव ठाकरे भाष्य करणार का? याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून आहे. दरम्यान आज सकाळी माध्यमांशी बोलतांना खासदार संजय राऊत यांनी मेळाव्यात मनसेसोबतच्या युतीवर नक्कीच भाष्य होईल. संदर्भ मिळतील. कोणताही संभ्रम असण्याचे कारण नाही. आमची भूमिका स्पष्ट आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यात अनेकदा संवाद आणि भेट झाली आहे. पण ताबडतोब काय भूमिका जाहीर अशी अपेक्षा आहे. पण तसं होत नाही. ग्राऊंड लेव्हलाला दोन्ही पक्षांच्या युतीचे काम सुरू झाले आहे. पण याअधिक याविषयी भाष्य आपण करू शकत नाही. ती भूमिका दोन्ही पक्षाचे प्रमुख मांडतील असे त्यांनी म्हटले.




