मुंबई | Mumbai
गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात (State Politics) ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Uddhav Thackeray and Raj Thackeray) एकत्र येणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. मात्र, हे दोन्हीही नेते परदेश दौऱ्यावर गेल्याची माहिती असून, ते मुंबईमध्ये परतल्यानंतर याबाबतचा पुढील निर्णय होण्याची शक्यता आहे. अशातच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने आज त्यांच्या सोशल मिडिया अकाऊंटवर एक सूचक पोस्ट केली आहे. त्यामुळे दोन्ही नेत्यांच्या एकत्र येण्याच्या चर्चेला आणखी उधाण आले आहे.
शिवसेना उबाठा (Shivsena UBT) पक्षाने केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, “वेळ आलीयं, एकत्र येण्याची, मुंबई आणि महाराष्ट्रासाठी (Maharashtra) शिवसैनिक तयार आहे, मराठी अस्मितेच्या रक्षणासाठी!”, अशा आशयाचा मजकूर त्यामध्ये आहे. अभिनेते महेश मांजरेकर यांनी ‘वास्तव में Truth’ या कार्यक्रमात राज ठाकरे यांची मुलाखत घेतली होती. या मुलाखतीत त्यांना “समजा शिवसेना फुटली, नाही फुटली तर तुम्ही अजूनही एकत्र येऊ शकता का?” असा प्रश्न विचारण्यात आला. यावर राज ठाकरे यांनी त्यांची भूमिका मांडली आहे. यावरुन राजकीय वर्तुळात अनेक चर्चा रंगल्या आहेत.
वेळ आलीयं, एकत्र येण्याची
मुंबई आणि महाराष्ट्रासाठी
शिवसैनिक तयार आहे,
मराठी अस्मितेच्या रक्षणासाठी! pic.twitter.com/aukbsiNPK5— ShivSena – शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray (@ShivSenaUBT_) April 26, 2025
दुसरीकडे ठाकरेंच्या शिवसेनेकडून या पोस्टच्या संदर्भात खुलासा करण्यात आल्याचे पुढे आले आहे. अशा प्रकारच्या पोस्ट दररोज सकाळी केल्या जातात आणि त्यातून कार्यकर्त्यांचा (Worker) उत्साह वाढावा, हा हेतू असल्याचे सांगण्यात आले आहे. तर अनेकांनी या पोस्टचा संदर्भ मनसे आणि शिवसेना यांच्या मनोमिलनाशी जोडल्याचे दिसून येत आहे. या पोस्टची (Post) सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे.
उद्धव आणि राज ठाकरे दोघेही परदेश दौऱ्यावर
उध्दव ठाकरे आणि कुटुंबीय युरोप दौऱ्यावरती (Tour) आहेत. ते मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये मुंबईमध्ये परतणार असल्याचे बोलले जात आहे. त्याचबरोबर मनसे अध्यक्ष राज ठाकरे देखील परदेश दौऱ्यावर असून ते २९ एप्रिलला मुंबईत परतणार आहेत. युतीच्या चर्चेदरम्यान ठाकरे बंधुंचा हा परदेश दौरा सुरू असून, हे दोन्ही नेते मुंबईत (Mumbai) परतल्यावर कोणता निर्णय घेतात, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून आहे.