मुंबई | Mumbai
दोन दिवसांपूर्वी मविआसह मनसेने मुंबईत (Mumbai) ‘सत्याचा मोर्चा’ काढत मतदार याद्यांतील (Voter List) घोळ, दुबार मतदार यावरून सरकारसह निवडणूक आयोगावर (Election Commission) निशाणा साधला होता. त्यानंतर आज (सोमवार) भाजप नेते आशिष शेलार (Aashish Shelar) यांनी पत्रकार परिषद घेत महाविकास आघाडीसह (Mahavikas Aaghadi) उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला. यानंतर आता उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेत शेतकर्यांच्या प्रश्नांवर संवाद साधत शेलारांना टोला लगावला.
ते म्हणाले की, ” सरकारने शेतकऱ्यांसाठी (Farmer) एक पॅकेज जाहीर केले, त्यानंतर आम्ही मोर्चा काढला. आजही शेतकऱ्यांची तीच मागणी आहे, कर्ज मुक्ती झाली पाहिजे. अतिवृष्टीनंतर केंद्राचे पाहणी पथक येणार आहे. हा दौरा दोन ते तीन दिवसांचा आहे. मराठवाड्याचा पाहणी दौरा केल्यानंतर नुकसानीचा अंदाज आल्यानंतर प्रस्ताव कधी पाठवणार? दोन ते तीन दिवसात अख्खा मराठवाडा कसा पाहणार? कर्जमाफीच्या मागणीसाठी शेतकरी रस्त्यावर उतरले. यानंतर मुख्यमंत्र्यांनी पुढच्या जूनचा वायदा केला आहे. पुढच्यावर्षी जूनमध्ये कर्जमाफी होणार असेल, तर तो पर्यंत असलेल्या कर्जावर हफ्ते फेडायचे की नाही? याशिवाय मुख्यमंत्र्यांनी एक विधान केले की, कर्जमाफी केल्यास बँकांचा फायदा होईल. आता कर्जमाफी केली तर बँकांचा फायदा आणि जूनमध्ये कर्जमाफी केली तर बँकांचा फायदा नाही हे कसं काय?” असा सवाल त्यांनी विचारला.
ते पुढे म्हणाले, “माझ्या पहिल्या हिवाळी अधिवेशनात कोणताही अभ्यास न करता, कोणतीही मागणी नसताना मी दोन लाखापर्यंत पीक कर्जमाफ केले. जी योजना आम्ही यशस्वीपणे अंमलात आणून दाखवली, ती यंत्रणा डेटा तसाच आहे. मग तुम्ही कर्जमाफीचा दुसरा टप्पा का जाहीर करत नाही? आम्ही केलं होतं हे लोकांनी मान्य केलं. आम्ही कोणतीही अट किंवा अभ्यास केला नव्हता, आम्ही शेतकऱ्यांशी प्रामाणिकपणे वागलो, तसं हे सरकार का वागत नाही?” असेही उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) म्हटले.
शेलारांनी फडणवीसांना पप्पू ठरवलं
मंत्री आशिष शेलारांनी केलेल्या टीकेवर बोलतांना उद्धव ठाकरे म्हणाले, शेलारांनी फडणवीसांना पप्पू ठरवलं असून त्यांनी केलेले हे प्रत्यारोप मतदारयादीतील घोळाचा पुरावा आहे. शेलारांनी लोकसभेसह (Loksabha) विधानसभेतील घोटाळ्याचे पुरावे दिले. एका शब्दांत शेलारांनी अनेक पक्षी मारले. निवडणूक आयोगाचे अॅप दुसरचं कुणी तरी हाताळत आहे. एकेका घरात ४०-५० मतदार ही निवडणूक (Election) आयोगाची भुताटकी असून, माझ्यासह माझ्या कुटुंबातील चौघांची नावं वगळली होती, असेही ठाकरे यांनी म्हटले.




