मुंबई । Mumbai
हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार पुढील सात दिवस महाराष्ट्रात अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या घाट माथ्यावर जोरदार पावसाचा अंदाज आयएमडीनं वर्तवला आहे.
पुढील दोन दिवसांमध्ये महाराष्ट्रातील विदर्भ आणि मराठवाड्यात अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे, याच दरम्यान वादळ देखील होणार असून, वाऱ्याचा वेग प्रति तास ३० ते ४० किमी इतका राहण्याचा अंदाज आहे, या पार्श्वभूमीवर सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना हायअलर्ट देण्यात आला आहे. पुणे घाटमाथ्यावर रेड अलर्ट, संपूर्ण कोकण किनारपट्टीला ऑरेंज अलर्ट, कोल्हापूर, सातारा आणि नाशिक घाटमाथ्यावरही तुफान पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
नाशिक घाटमाथ्यावर तुफान पावसाचा देण्यात आलेला अंदाज खरा ठरल्यास गोदावरी नदीला पूर येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या अंदाजाच्या पार्श्वभूमीवर आगामी २४ तास या भागाच्या दृष्टीने महत्वाचे मानले जात आहे.
पालघर जिल्ह्यात दोन दिवस पावसाचा इशारा देण्यात आला होता. रविवारी संध्याकाळी हवामान विभागाने सोमवारी सुद्ध अलर्ट जाहीर केल्याने वादळासह मुसळधार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे पालघरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सोमवारची सुट्टी जाहीर केली आहे.
जिल्ह्यातील अंगणवाडी, सरकारी आणि खाजगी प्राथमिक आणि माध्यमिक शाळा, जिल्हा परिषद, नगरपालिका, अनुदानित आणि विनाअनुदानित, सर्व आश्रम शाळा आणि महाविद्यालयांना सोमवारची सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.




