मुंबई | Mumbai
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी विधानसभेची निवडणुक लढल्याने राज्यसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याने त्यांची जागा रिक्त झाली होती. या जागेसाठी मंत्री छगन भुजबळ इच्छुक होते. त्यासह माजी खासदार नवनीत राणा यांनीही इच्छुकता दाखवली होती. त्यापार्श्वभूमीवर नवनीत राणांनी आधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेतली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना याबाबत विनंती केली होती. परंतु, उमेदवारी मिळण्यासाठी ठेवलेली अट मान्य नसल्यामुळे राज्यसभेची खासदारकी नवनीत राणा यांना मिळू शकली नाही. यामागे नेमके काय घडले, याबाबत नवनीत राणा यांनी पोस्ट लिहिली आहे.
आधुनिक भारताची उभारणी करणारे भारताचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी, निर्भीड व कणखर गृहमंत्री अमित शाह, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनात व नेतृत्वात भारतीय जनता पार्टीचे काम करणारी मी प्रामाणिक व निष्ठावान कार्यकर्ता आहे. मी कोणत्याही पदासाठी आपली विचारधारा बदलणार नाही. मी सदैव भारतीय जनता पार्टीचे कार्य प्रामाणिकपणे करीत राहील, आमचे मार्गदर्शक व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवाभाऊ यांनी उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रावहिनी पवार यांना ही जागा भारतीय जनता पार्टीला सोडण्याबाबत विनंती केली होती. मात्र अपरिहार्य कारणास्तव ते शक्य झाले नाही. असे आश्वासन नवनीत राणा यांनी सोशल मीडियावरील पोस्टमध्ये दिले आहे.
आदरणीय सुनेत्रावहिनी अजितदादा पवार आणि पार्थदादा पवार यांनी मला राज्यसभेवर पाठवण्याबाबत इच्छा व्यक्त केली होती. माझ्या कार्यक्षमतेवर विश्वास दाखवत त्यांनी माझा विचार केला, याबद्दल मी त्यांची मनःपूर्वक आभारी आहे. मात्र, राज्यसभेची उमेदवारी स्वीकारण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करण्याची अट मला मान्य नव्हती. त्यामुळे मा. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या सूचनेवरून मी सुनेत्रावहिनी अजितदादा पवार यांची प्रत्यक्ष भेट घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची राज्यसभेची जागा भारतीय जनता पक्षाला सोडण्याची विनंती केली होती. परंतु काही कारणास्तव हे शक्य झाले नाही. तरीदेखील माझ्यावर विश्वास ठेवून मला राज्यसभेसाठी संधी देण्याचा विचार केल्याबद्दल मी सुनेत्रावहिनी अजितदादा पवार व पार्थदादा पवार यांची आभारी आहे.




