मुंबई । Mumbai
राज्य सरकारच्या महसूल विभागाने विद्यार्थ्यांसाठी दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. यामुळे विद्यार्थ्यांना शैक्षणिक कामांसाठी बसणारा आर्थिक भुर्दंड काही प्रमाणात कमी होणार आहे.
विद्यार्थ्यांना विविध कामांसाठी प्रतिज्ञापत्र आवश्यक असते. प्रतिज्ञापत्र स्टॅम्प पेपरवर टाइप करावे लागते. या स्टॅम्पसाठी 500 रुपये मोजावे लागत होते. हेच शुल्क आता माफ करण्यात आले आहे. परंतु, या निर्णयामुळे आता विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
नागरिक, विद्यार्थ्यांना कसा फायदा होणार?
सदर निर्णयामुळे एका साध्या कागदावर स्वसाक्षांकित (सेल्फ अटेस्टेट ) अर्ज लिहावा लागणार आहे.साध्या अर्जावर तहसील कार्यालयातून प्रमाणपत्र मिळणार आहे. तसेच दहावी,बारावीच्या निकालानंतर विद्यार्थी व पालकांना प्रतिज्ञापत्र लागते त्यासाठी लागणारा एकूण 3 ते 4 हजारांचा खर्च वाचणार आहे.सदर निर्णयाची तात्काळ अंमलबजावणी करण्याचे आदेश मंत्री बावनकुळे यांनी दिले आहेत.
कोणत्या प्रतिज्ञापत्रांसाठी निर्णय लागू?
जात पडताळणी प्रमाणपत्र,उत्पन्नाचा दाखला,रहिवासी प्रमाणपत्र,नॉन क्रीमी लेयर सर्टिफिकेट,राष्ट्रीयत्व प्रमाणपत्रासह इतर सर्व प्रकारच्या प्रतिज्ञापत्रासाठी हा निर्णय लागू करण्यात आला आहे.
राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. या योजनेत महिलांच्या खात्यात दर महिन्याला दीड हजार रुपये जमा केले जातात. या योजनेसाठी सरकारला मोठा खर्च करावा लागत आहे. त्यामुळे अन्य योजनांसाठी निधीची तरतूद करताना अडचणी येत आहेत. यासाठी म्हणून दरवाढ करण्याचे प्रकार सुरू झाल्याचे दिसत आहे. 100 रुपयांना मिळणारा स्टॅम्प थेट 500 रुपयांवर गेला आहे.