मुंबई | Mumbai
विधानपरिषदेच्या (VidhanParishad) मुंबई व कोकण पदवीधर आणि मुबंई व नाशिक शिक्षक या चार मतदारसंघासाठी सकाळी आठ वाजेपासून विविध मतदान केंद्रांवर मतमोजणी सुरु आहे. मात्र, अद्यापपर्यंत एक निकाल हाती आला असून इतर ठिकाणी मतमोजणी सुरु आहे. आतापर्यंत हाती आलेल्या कलांनुसार काही ठिकाणी उमेदवारांमध्ये अटीतटीची लढत होताना पाहायला मिळत आहे. यातील एक ठिकाणी ठाकरेंच्या शिवसेनेचे तर एका ठिकाणी भाजपचा उमेदवार आघाडीवर असल्याचे दिसत असून नाशिक शिक्षक मतदारसंघात महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांसह अपक्ष उमेदवारामध्ये ‘काटे की टक्कर’ सुरु आहे.
मुंबई पदवीधर मतदारसंघातून ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार अनिल परब २५ हजार मतांनी विजयी झाले आहेत. त्यांनी भाजपचे उमेदवार किरण शेलार यांचा पराभव केला आहे. परब यांचा विजय होताच ठाकरेंच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष सुरू केला. ४ पैकी २ फेरीतच अनिल परब यांनी जाहीर मतांचा कोटा गाठल्याने त्यांनी विजयाच्या दिशेने वाटचाल केली होती. यानंतर अखेर त्यांचा विजय झाला आहे.
तर मुंबई शिक्षक मतदारसंघातून ठाकरेंच्या शिवसेनेचे जग्गनाथ अभ्यंकर हे पहिल्या आणि दुसऱ्या फेरीत आघाडीवर आहेत. त्यांना पहिल्या पसंती फेरीत ६१ मतांची आघाडी होती. तर दुसऱ्या पसंती फेरीत जगन्नाथ अभ्यंकर यांना ७३ मतांची आघाडी होती. यामुळे आता मुंबई शिक्षक मतदारसंघाची मतमोजणी बाद फेरीकडे वळाली आहे. मुंबई शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत १२ हजार शिक्षक मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला होता. त्यापैकी ४०८ मते अवैध ठरवली होती. यामुळे मुंबई शिक्षक मतदारसंघात ५ हजार ८०० मतांचा विजयी कोटा ठरवण्यात आला आहे. त्यामुळे आता हा कोटा नेमका कोण पूर्ण करतो हे पाहणे महत्वाचे असणार आहे. अभ्यंकर यांच्यासमोर भाजपचे शिवनाथ दराडे आणि शिक्षक भारतीचे सुभाष मोरे यांचे आव्हान आहे.
तसेच कोकण पदवीधर मतदारसंघातून भाजपचे उमेदवार निरंजन डावखरे आघाडीवर असून त्यांच्यासमोर कॉंग्रेसचे रमेश कीर हे उमेदवार आहेत. कोकण पदवीधरमध्ये एकूण १ लाख ४३ हजार २९७ मतपत्रिका योग्यरित्या आढळल्या होत्या. यानंतर प्रत्येक टेबलवर १ हजार मतपत्रिका मोजणीसाठी देण्यात आल्या होत्या. त्यामध्ये पहिल्या फेरीत भाजपचे निरंजन डावखरे आघाडीवर असून त्यांना ३५ हजार तर कॉंग्रेसच्या रमेश कीर यांना ७ हजार मते मिळाली आहेत. पहिल्या फेरीतच
डावखरे यांना १२ हजार मतांची आघाडी मिळाल्याने त्यांचा विजय निश्चित असल्याचे बोलले जात आहे.
दुसरीकडे नाशिक शिक्षक मतदारसंघात महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांसह अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे यांच्यात ‘काटे की टक्कर’ सुरु आहे. नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत पहिल्या फेरीत ३० हजार मतपत्रिकांची मोजणी केली जाणार आहे. तर दुसऱ्या फेरीत ३४ हजार ८५३ मतपत्रिकांची मोजणी केली जाणार आहे.यानंतर अवैध मतांची मोजणी करून कोटा ठरवला जाणार असून त्यानंतरच खऱ्या अर्थाने उमेदवारांची (Candidate) मतांची मोजणी केली जाणार आहे. त्यामुळे नाशिक शिक्षक मतदारसंघाचा निकाल रात्री उशिरापर्यंत लागण्याची शक्यता आहे.
सध्या नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या मतमोजणीची पहिल्या फेरी सुरु असून या फेरीत महायुतीचे उमेदवार किशोर दराडे आघाडीवर आहेत. तर महाविकास आघाडीचे उमेदवार संदीप गुळवे व अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे हे दराडे यांच्यापेक्षा थोड्याफार मतांनी पिछाडीवर आहेत. त्यामुळे मतमोजणीवेळी सातत्याने हे आकडे बदलत जाणार असून नाशिक शिक्षक मतदारसंघात अत्यंत चुरशीची लढत होण्याची शक्यता आहे. यामुळे या लढतीत कोणता उमेदवार बाजी मारतो? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.