मुंबई । Mumbai
मुंबईसह राज्यभरात पुन्हा एकदा मुसळधार पावसाचे आगमन होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. काही दिवसांपूर्वी पावसाने घेतलेला ब्रेक पाहता, यंदा पाऊस लवकर संपला की काय अशी चर्चा सुरू झाली होती. मात्र, रविवारी 14 सप्टेंबर आणि सोमवार 15 सप्टेंबरला राज्याच्या बहुतेक भागात जोरदार पाऊस होणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
सिंधुदुर्ग, धुळे आणि नंदुरबार वगळता महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांना पावसाचा इशारा देण्यात आला आहे. आयएमडीने राज्यासाठी यलो अलर्ट तर रायगडसाठी ऑरेंज अलर्ट दिला आहे. सोमवार, 15 सप्टेंबर रोजी सातारा, रत्नागिरी, पुणे आणि रायगड जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून, उर्वरित जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट लागू आहे.
हवामान खात्याच्या अंदाजानुसार, मुंबई, ठाणे, रत्नागिरी, पुणे घाटमाथा, सातारा घाटमाथा, कोल्हापूर घाटमाथा, सोलापूर, धाराशिव, लातूर, अकोला, अमरावती, नागपूर आणि भंडारा या जिल्ह्यांमध्ये जोरदार वादळी पावसाची शक्यता आहे. तर नाशिक, अहिल्यानगर, जळगाव, पुणे, सातारा, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, बुलडाणा, वाशीम, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदिया या जिल्ह्यांमध्ये विजांसह वादळी पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
जळगाव जिल्ह्यात मागील तीन दिवसांपासून पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. काही भागांत मुसळधार पावसाची नोंद झाली असून, काही ठिकाणी हलक्या सरी कोसळत आहेत. पुढील दोन दिवस देखील मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यामुळे खरीप हंगामातील मका, कपाशी, उडीद आणि मूग यासारख्या पिकांवर रोगराईचा प्रादुर्भाव वाढत आहे.
दरम्यान, मराठवाड्यासाठी महत्त्वपूर्ण मानल्या जाणाऱ्या जायकवाडी धरणातून मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात येत आहे. या वर्षात पहिल्यांदाच धरणाचे सर्व 27 दरवाजे उघडण्यात आले आहेत. सध्या धरणातून 1 लाख 13 हजार 184 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू असून, यामध्ये 9 आपत्कालीन दरवाजेदेखील उघडण्यात आले आहेत. दरवाजे अर्धा फूट ते साडेचार फूटापर्यंत उचलण्यात आले आहेत.
पावसाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. नद्यांच्या काठावर, धरणाच्या पाणलोट क्षेत्रात आणि भूस्खलनप्रवण भागांत जाणे टाळावे, असा सल्ला देण्यात आला आहे. राज्यातील विविध भागांमध्ये आधीच पावसामुळे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले असताना, येणाऱ्या दोन दिवसांत पावसाचा जोर कायम राहिल्याने शेतकरी आणि नागरिकांमध्ये चिंता वाढली आहे.




