Tuesday, January 6, 2026
Homeमहाराष्ट्रZilla Parishad Elections : जिल्हा परिषदेचा धुरळा याच आठवड्यात? संभाव्य तारीख समोर

Zilla Parishad Elections : जिल्हा परिषदेचा धुरळा याच आठवड्यात? संभाव्य तारीख समोर

मुंबई । Mumbai

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा रणसंग्राम आता अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांचे निकाल नुकतेच जाहीर झाल्यानंतर, आता सर्वांचे लक्ष जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांकडे लागले आहे. मुंबई आणि पुण्यासह राज्यातील २९ महापालिकांसाठी आजपासून उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली असतानाच, जिल्हा परिषद निवडणुकांबाबतही एक मोठी अपडेट समोर आली आहे.

- Advertisement -

महायुतीचे नेते आणि माजी मंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी जिल्हा परिषद निवडणुकांच्या तारखेबाबत महत्त्वाचे संकेत दिले आहेत. मंचर येथील एका विकासकामाच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना त्यांनी सांगितले की, येत्या चार ते आठ दिवसांत जिल्हा परिषद निवडणुकांची अधिकृत घोषणा होऊ शकते. वळसे-पाटील यांनी यापूर्वी नगरपरिषद निवडणुकांच्या तारखांबाबत वर्तवलेला अंदाज खरा ठरला होता, त्यामुळे त्यांच्या या विधानाला राजकीय वर्तुळात मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे.

YouTube video player

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आरक्षणाच्या मुद्द्यावरून गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित होत्या. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने ३१ जानेवारी २०२६ पूर्वी राज्यातील सर्व प्रलंबित निवडणुका घेण्याचे कडक निर्देश दिले आहेत. या पार्श्वभूमीवर, राज्य निवडणूक आयोग डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात पत्रकार परिषद घेऊन निवडणुकीचा सविस्तर कार्यक्रम जाहीर करण्याची शक्यता आहे. ३१ जिल्हा परिषदा आणि ३३१ पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठीची प्रशासकीय तयारी आता अंतिम टप्प्यात आली आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, निवडणूक प्रक्रियेचा आराखडा जवळपास निश्चित झाला आहे. निवडणुकांची घोषणा झाल्यानंतर उमेदवारांना अर्ज भरण्यासाठी सात दिवसांचा कालावधी दिला जाईल. त्यानंतर दोन दिवस अर्ज मागे घेण्यासाठी मुदत असेल. अर्जांच्या छाननीनंतर उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध केली जाईल. महत्त्वाचे म्हणजे, २८ आणि २९ जानेवारी २०२६ रोजी मतदान प्रक्रिया पार पडू शकते आणि त्यानंतर लगेचच निकाल जाहीर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

राज्यात सध्या तीन टप्प्यांत निवडणुकांचे नियोजन करण्यात आले आहे. पहिल्या टप्प्यात नगरपरिषदांच्या निवडणुका पार पडल्या आहेत. दुसऱ्या टप्प्यात २९ महापालिकांची प्रक्रिया सुरू झाली असून, तिसऱ्या आणि शेवटच्या टप्प्यात ३२ जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका होणार आहेत. पुणे, कोल्हापूर, अहिल्यानगर , सोलापूर, नाशिक, रायगड, रत्नागिरी, नांदेड, बीड आणि अमरावती यांसारख्या महत्त्वाच्या जिल्ह्यांमध्ये जिल्हा परिषदांच्या निवडणुका प्रलंबित आहेत.

या निवडणुकांमुळे ग्रामीण भागातील राजकारण आता पूर्णपणे तापणार आहे. महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका एकाच वेळी जाहीर झाल्यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी आपली कंबर कसली असून, उमेदवारांची चाचपणी आणि रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. या निवडणुकीच्या निकालांचा आगामी काळातील राज्यावर मोठा परिणाम होणार असल्याने सर्वच पक्षांसाठी ही प्रतिष्ठेची लढाई ठरणार आहे.

ताज्या बातम्या

Nashik Politics : नाशकात मोठी राजकीय घडामोड; दोन माजी महापौर करणार...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik महापालिका निवडणुकीच्या (Mahapalika Election) धामधुमीत शहरात मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत. उमेदवारी जाहीर होण्यापूर्वी भाजपमध्ये (BJP) असलेले नाशिकचे दोन माजी...