Sunday, September 22, 2024
Homeनगरमहात्मा फुले कृषि विद्यापीठात आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष साजरे

महात्मा फुले कृषि विद्यापीठात आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष साजरे

राहुरी |तालुका प्रतिनिधी| Rahuri

- Advertisement -

आपल्या पंतप्रधानांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर पौष्टिक तृणधान्यांचे आहारातील महत्व पटवून सांगितले. त्यामुळे संयुक्त राष्ट्रसंघाने पौष्टिक तृणधान्य लागवडीला व त्याचा आहारात समावेश व्हावा, यासाठी वर्ष 2023 आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष म्हणुन घोषीत केले. पौष्टिक तृणधान्य हे कमी पाण्यात, उष्णतेत तग धरणारे पीक आहेत. त्यांच्या पौष्टिक गुणधर्मामुळे आरोग्यासाठी त्याचे अनन्यसाधारण महत्व आहे. आपल्या देशातील पौष्टिक तृणधान्यांमध्ये जगाचे आरोग्य सुधारण्याची ताकद आहे, असे प्रतिपादन राज्याचे कृषि आयुक्त सुनिल चव्हाण यांनी केले.

महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी आणि कृषि विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष-2023 निमित्ताने विद्यापीठाच्या ज्वारी सुधार प्रकल्पावर रब्बी दिवस, चर्चासत्रे, कृषि प्रदर्शन व शिवार फेरीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणुन आदर्श गाव संकल्प, प्रकल्प समितीचे कार्याध्यक्ष पद्मश्री डॉ. पोपटराव पवार उपस्थित होते.

यावेळी व्यासपीठावर विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. सुनिल गोरंटीवार, विस्तार शिक्षण संचालक डॉ. तानाजी नरुटे, अधिष्ठाता (कृषि) डॉ. उत्तम चव्हाण, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी शिवाजी जगताप, कुलसचिव प्रमोद लहाळे, वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुख डॉ. विजू अमोलिक, ज्वारी सुधार प्रकल्प प्रमुख डॉ. दिपक दुधाडे आणि कृषिभूषण विष्णू जरे उपस्थित होते. चव्हाण म्हणाले, विद्यार्थ्यांनी जीवनात प्रयत्न करत रहा, संधी निर्माण होत राहती. कृषिच्या विद्यार्थ्यांनी शेतकर्यांच्या शेतावर जावून समस्या जाणून घ्या व त्यावर संशोधन करा. शेतकर्यांना परवडतील व त्यांचे श्रम कमी होतील असे छोटी छोटी अवजारे विद्यापीठाने विकसीत करावी.

पद्मश्री डॉ. पोपटराव पवार म्हणाले, मातीचे आरोग्य आणि पाण्याचे आरोग्य यावर मानवाचे आरोग्य आधारीत आहे. म्हणुन माती व पाण्याची जपवणूक करा. बदलत्या हवामानाच्या समस्येला जग सामोरे जात आहे. या बदलत्या हवामानाला सामोरे जाताना पौष्टिक तृणधान्याचे महत्व अधोरेखीत होत आहे. हे पौष्टिक तृणधान्य बदलत्या हवामानात चांगले उत्पादन देते व आपले आरोग्य सुदृढ ठेवते. निर्व्यसणी व निरोगी पिढी जन्माला घालायची असेल तर आहारामध्ये पौष्टिक तृणधान्याचा समावेश करावा. डॉ. सुनिल गोरंटीवार म्हणाले, कुलगुरुंच्या मार्गदर्शनाखाली विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षानिमित्त विविध उपक्रमांचे नियोजन केलेले आहे.

शेतकर्‍यांना कार्बन क्रेडीटचा कसा फायदा होईल, यावर विद्यापीठात काम सुरु आहे. पौष्टिक तृणधान्याचा वापर करुन विद्यापीठाने विविध पौष्टिक खाद्य पदार्थ बनविले आहेत. कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुख डॉ. विजू अमोलिक यांनी केले. याप्रसंगी शेतकर्‍यांनी, विद्यार्थ्यानी व मान्यवरांनी प्रात्यक्षिक प्रक्षेत्राला, कृषि प्रदर्शनाला भेटी दिल्या. याप्रसंगी डॉ. दिपक दुधाडे, डॉ. कुशल बर्हाटे, डॉ. योगेश बन, डॉ. चांगदेव वायाळ, डॉ. उदयकुमार दळवी, डॉ. निलेश मगर, कु. प्रतिक्षा शिंदे या शास्त्रज्ञांनी पौष्टिक तृणधान्यांच्या विविध विषयांवर व्याख्याने दिली.

याप्रसंगी श्रीमंत रणपिसे, डॉ. गोरक्ष ससाणे, रविंद्र माने, विलास नलगे, श्री. गायकवाड, गहिनीनाथ कापसे, श्री. गवळी, शंकर किर्वे, महेद्र ठोकळे यांच्यासह कृषि विभागाचे विविध अधिकारी व विद्यापीठातील विभाग प्रमुख, शास्त्रज्ञ, अधिकारी, कर्मचारी, शेतकरी, विद्यार्थी व विद्यार्थीनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. सचिन सदाफळ तर आभार डॉ. राजेंद्र वाघ यांनी मानले.

- Advertisment -

ताज्या बातम्या