मुंबई | प्रतिनिधी Mumbai
अडीच वर्ष रात्र न् दिवस केलेल्या कष्टाचं, मेहनतीचं, लाडक्या बहिणीचं, भावांचं, ज्येष्ठांचं, तरुणांचं आणि शेतकऱ्यांचे हे यश आहे, विकास कामे चौपट पटीने केली. लोकाभिमूख योजना केल्या आणि विकासही केला. दोन्हीची सांगड घातली. त्यामुळेच राज्यातील जनतेने विश्वास दाखवला. म्हणूनच मी जनतेसमोर नतमस्तक होतो. त्यांनाही वंदन करतो, हे यश बाळासाहेबांच्या विचाराचं आहे. महायुतीच्या एकजुटीचं आहे. सत्तेची अडीच वर्षातील कामांमुळेच महाविजय असल्याचे हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आज मुंबईत शिवसेनेचा मेळावा पार पडला त्या वेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते.
शिवसेना शिंदे गटाकडून हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा जन्मदिवस 23 जानेवारी विजयोत्सव म्हणून साजरा केला जात आहे. वांद्रे कुर्ला संकुलात हा मेळावा पार पडला. या वेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदें यांनी जोरदार भाषण केले.
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण ही शिकवण अंगिकारून शिवसेना पक्षाची वाटचाल अविरतपणे सुरू आहे. बाळासाहेबांच्या विचारांनी वाटचाल करताना गेली अडीच वर्षे लोकाभिमुख कामकाज करण्याचा प्रयत्न आम्ही केला. शिवसेनेला वाचवण्यासाठी आम्ही अडीच वर्षांपूर्वी वेगळा निर्णय घेतला.
त्यानंतर आता नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत जनतेने खरी शिवसेना कुणाची ते सिध्द करून दाखवले आहे. त्यामुळे टीकाकारांची तोंडे बंद झाली असून त्यांच्यावर आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली आहे. बाळासाहेबांचे ज्वलंत हिंदुत्त्ववादी विचार पुढे घेऊन जाताना लोकांसाठी काम करणारी संघटना म्हणून शिवसेना आपले कार्य अविरतपणे चालू ठेवेल असा विश्वास यावेळी बोलताना व्यक्त केला.