Saturday, November 16, 2024
Homeनगरमहाविकास आघाडीकडून सत्तेचे फासे आवळण्यास सुरूवात

महाविकास आघाडीकडून सत्तेचे फासे आवळण्यास सुरूवात

काँग्रेसचे सदस्य मुंबईला : राष्ट्रवादी, सेनेची आज स्वतंत्र बैठक, गडाखांची भिस्त शिवसेनेवर

अहमदनगर (प्रतिनिधी)- जिल्हा परिषदेतील सत्ता स्थापनेसाठी आता बोटावर मोजण्याएवढेच दिवस शिल्लक आहेत. यामुळे राज्याप्रमाणे जिल्हा परिषदेत सत्ता स्थापनेसाठी महाविकास आघाडीकडून फासे आवळण्यास सुरूवात झाली आहे. त्या अनुषंगाने गुरूवारी राष्ट्रवादीच्या पदाधिकारी आणि काही सदस्यांची नगरमध्ये बैठक झाली. दरम्यान, काँग्रेसचे सदस्य मुंबईला श्रेष्ठींच्या भेटी गेले असून शनिवारी त्यांची नगरमध्ये बैठक होणार आहे. तर आज राष्ट्रवादी आणि शिवसेनेची स्वतंत्र बैठक होणार असल्याचे सांगण्यात आले.

- Advertisement -

जिल्हा परिषदेत भाजपला सत्तेपासून रोखून त्या ठिकाणी महाविकास आघाडीचा अध्यक्ष करण्यासाठी राष्ट्रवादी, काँग्रेस, सेना आणि क्रांतिकारी शेतकरी पक्षाच्या सदस्यांनी तयारी सुरू केली आहे. यासाठी तिनही पक्षाच्या सदस्यांच्या भेटीगाठी सिलसीला सुरू आहे. गुरूवारी लालटाकी परिसरात राष्ट्रवादीच्या पदाधिकारी आणि नेत्यांची बैठक झाली.

यावेळी सत्ता स्थापनेसोबत सर्वाधिक सदस्य असल्याने राष्ट्रवादीच्या वाट्याला अध्यक्ष पदासोबत अन्य कोणते सभापतीपद मिळविता येईल, यावर खल झाली. त्याचसोबत पदाधिकारी निवडीच्यावेळी राष्ट्रवादीचे सर्वच्यासर्व 19 सदस्य कसे एकसंघ राहतील, यासाठी काळजी घेण्याच्या सुचना देण्यात आल्या. विशेष म्हणजे विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या जिल्हा परिषदेच्या सदस्यांचे झालेले राजकीय ‘डॅमेज’ आता कंट्रोल करण्यात पक्षाच्या नेत्यांना यश आले असल्याचे यावेळी सांगण्यात आले. आज (शुक्रवारी) सकाळी राष्ट्रवादीचे जिल्हा निरिक्षक अंकुश काकडे यांच्या उपस्थितीत पक्षाच्या सदस्यांची नगरमध्ये बैठक होणार आहे. यावेळी जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांच्यासह पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

याच दरम्यान शिवसेनेच्या सदस्यांची स्वतंत्र बैठक नगरमध्ये होणार आहे. यावेळी महाविकास आघाडीत सेनेच्या वाट्याला काय येणार किंवा सेनेने कोणते पद मागावयाचे यावर चर्चा होणार आहे. काँग्रेसचे काही सदस्य गुरूवारी मुंबईला पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या भेटीला गेले होते. सायंकाळी उशीरा त्यांना भेटीची वेळ मिळालेली होती. त्याठिकाणी चर्चा केल्यानंतर शनिवारी नगरमध्ये काँग्रेसच्या सदस्यांची बैठक होणार असल्याचे सुत्रांनी सांगितले. महाविकास आघाडीत महत्वपूर्ण समजल्या जाणार्‍या नेवाशाच्या गडाख गटाने शिवसेनेसोबत असल्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळे शिवसेना जो निर्णय घेईल, त्याप्रमाणे गडाख गटाचा निर्णय राहणार असल्याचे सांगण्यात आले.

‘भाजप’ ची मुंबईतील बैठक रद्द
विधानसभा निवडणुकीनंतर जिल्ह्यातील भाजप नेते यांनी आ. राधाकृष्ण विखे पाटील गटावर आरोप करत त्यांच्यामुळे पक्षाचे नुकसान झाल्याचा आरोप केला होता. आरोप करणारे ते भाजप नेते आणि विखे गट यांच्यातील वाद मिटविण्यासाठी गुरूवारी मुंबईत पक्षाची बैठक होणार होती. मात्र, ऐनवेळी ही बैठक रद्द झाली आहे. यामुळे जिल्हा परिषद पदाधिकारी निवडीत भाजप सहभागी होणार की नाही याबाबत प्रश्नचिन्ह आहे.

राष्ट्रवादीकडून ‘घुले’
विद्यमान परिस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसकडून अध्यक्षपदासाठी उपाध्यक्षा राजश्रीताई घुले यांचे नाव आघाडीवर आहे. मात्र, आज पक्षाच्या सदस्यांची बैठक असून यावेळी काय चर्चा होणार याकडे जिल्ह्याचे लक्ष आहे. जिल्हा परिषदेत अध्यक्षपदावर विराजमान होण्यासाठी आता घुले यांनी देखील सक्रिय प्रयत्न सुरू केले असून त्यादृष्टीने त्यांच्या पक्षाच्या नेत्यासोबत गाठी ‘भेटी’सुरू झाल्या आहेत.

भाजपचे सदस्य विखेंच्या प्रतिक्षेत
जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन करण्यासाठी प्रयत्न करावयाचे की नाही, याबाबत भाजपच्या गोटात सध्या शांतता दिसत आहे. पक्षाच्या सदस्यांना अद्याप विखे गटाकडून कोणताच निरोप आला नसल्याचे सांगण्यात येत आले. मात्र, येत्या दोन दिवसांत काहीतरी घडेल, अशा आशेवर भाजपचे सदस्य असून आता प्रदेश पातळीवरून जिल्ह्यात लक्ष घालण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या