Friday, November 22, 2024
Homeब्रेकिंग न्यूजMaharashtra Assembly Elections: राज्यात बंडोबा झाले उदंड; मविआ आणि महायुतीत नेत्यांची वाढली...

Maharashtra Assembly Elections: राज्यात बंडोबा झाले उदंड; मविआ आणि महायुतीत नेत्यांची वाढली डोकेदुखी, कुठे झाली बंडखोरी

मुंबई | Mumbai
आज विधानसभा निवडणुकीचा उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. अर्ज मागे घेण्याची मुदत आज संपली आहे. राज्यात निर्माण झालेल्या गुंतागुंतीच्या राजकीय परिस्थितीमध्ये यावेळच्या विधानसभा निवडणुकीत बंडखोरांची संख्या मोठ्या प्रमाणात होती. अनेक मतदारसंघात बंडखोरांनी आपली उमेदवारी मागे घेतली मात्र काही ठिकाणी बंडोबांनी दोन्ही आघाड्यांचे टेन्शन कायम ठेवले आहे. बंडखोरांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घ्यावेत यासाठी शेवटच्या क्षणापर्यंत महायुती आणि महाविकास आघाडीमधील नेत्यांकडून त्यांची मनधरणी करण्यात आली. काही ठिकाणी यश आलं मात्र अनेक ठिकाणी बंडखोरांनी आपले उमेदवारी अर्ज कायम ठेवले आहेत. त्यामुळे आता अनेक विधानसभा मतदारसंघात तिरंगी, चौरंगी लढत होणार असून, याचा मोठा फटका हा अधिकृत उमेदवारांना बसण्याची शक्यता आहे.

कोण कोणत्या मतदारसंघात बंडखोरी झाली?
नांदेडच्या मुखेड विधानसभा मतदारसंघात महायुतीमध्ये बंडखोरी झालीय. भाजपकडून आमदार तुषार राठोड यांना उमेदवारी देण्यात आलीय. येथे शिंदे गटाचे नेते बालाजी पाटील खतगावकर यांनी अपक्ष अर्ज भरला होता. त्यांनी आपला अपक्ष उमेदवारी अर्ज कायम ठेवलाय. येथे काँग्रेसकडून माजी आमदार हनुमंत पाटील बेटमोगरेकर रिंगणात आहेत.

- Advertisement -

हे ही वाचा: Maharashtra Assembly Elections : जर तुमच्यात दम नव्हता तर कशाला…; मधुरीमाराजे यांची माघार, सतेज पाटील भडकले

पुण्यातील कसबा मतदारसंघात महाविकास आघाडीमध्ये बंडखोरी झाली आहे. कमल व्यवहारे यांनी आपला उमेदवारी अर्ज कायम ठेवला आहे. त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता. अर्ज मागे घेण्यासाठी प्रयत्न करण्यात आले, मात्र ते निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत.

मालेगावमध्ये महायुतीमध्ये बंडखोरी झाली आहे. मालेगावात बंडूकाका बच्छाव यांनी आपला अपक्ष उमेदवारी अर्ज कायम ठेवला आहे. तर भाजपचे बंडखोर उमेदवार कुणाल सूर्यवंशी देखील निवडणुकीच्या रिंगणात आहेत. याठीकाणी आता अद्वय हिरे, दादा भुसे आणि बंडूकाका बच्छाव अशी तिरंगी लढत होणार आहे.

नांदगाव येथे चौरंगी लढत होणार असल्याने सुहास आण्णा कांदे यांची चिंता वाढलीय. अपक्ष उमेदवार समीर भुजबळ यांनी मतदानासाठी शिट्टी निशाणी घेतलीय. ठाकरे गटाचे गणेश धात्रक, आणि अपक्ष उमेदवार असलेले राहुल बोरसे यांच्यात ही लढत होणार आहे.

हे ही वाचा: Sada Sarvankar: राज ठाकरेंनी भेट नाकारल्यामुळे आता निवडणूक लढवणारच – सदा सरवणकर

वाशिम विधानसभा मतदारसंघातही बंडखोरी कायम आहे. महाविकास आघाडीकडून डॉ.सिद्धार्थ देवळे यांना शिवसेना उद्धव ठाकरे (गट ) कडून उमेदवारी देण्यात आलीय. मात्र येथे ठाकरे गटातील मदन उर्फ राजा भैया पवार हे निवडणुक लढवण्यास इच्छुक होते. त्यामुळे त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता. आज त्यांनी आपला उमेदवारी अर्ज कायम ठेवला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा विधानसभा मतदारसंघ असलेल्या कोपरी पचपाखडी मतदारसंघात महाविकास आघाडीमध्ये बिघाडी झाली आहे. काँग्रेसचे नेते मनोज शिंदे यांनी बंडखोरी केली होती. त्यांनी आपला उमेदवारी अर्ज कायम ठेवला आहे.

हिंगणघाट विधानसभा मतदारसंघात देखील महाविकास आघाडीत बंडखोरी झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे माजी आमदार राजू तीमांडे यांनी आपला उमेदवारी अर्ज कायम ठेवला आहे. तर सुधीर कोठारी यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. या मतदारसंघातून मविआकडून अतुल वांदीले यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघात महायुतीत बंडखोरी झाली आहे. भाऊसाहेब कांबळे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला. मुख्यमंत्र्यांच्या सूचना केल्यानंतरही कांबळे यांची माघार घेतली नाही. शिंदे गटाकडून भाऊसाहेब कांबळे तर अजित पवार गटाकडून लहू कानडे यांना देण्यात एबी फॉर्म देण्यात आले होते. आज पक्षाकडून कांबळे यांना उमेदवारी मागे घेण्याबाबत सूचना देण्यात आल्या होत्या. कांबळेचा अर्ज कायम राहिल्याने महायुतीत बंडखोरी झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

जालन्यात महाविकास आघाडीत बंडखोरी झाली आहे. ठाकरे गटाचे शिवाजीराव चोथे हे अपक्ष म्हणून उमेदवारी करत आहे. जालन्यातील घनसावंगी मतदारसंघांमधून भाजपचे माजी विधानसभा प्रमुख सतीश घाडगे हे निवडणूकीला उभे आहे. यामुळे शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार हिकमत उढाण यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे मविआत देखील उद्धव ठाकरे गटाचे शिवाजीराव चोथे यांनी बंडखोरी करत अपक्ष अर्ज दाखल केलाय.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या