मुंबई | Mumbai
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीत वादाची ठिणगी पडली असून या ठिणगीचा भडका बुधवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत पाहायला मिळाला. कारण, शिवसेना शिंदे गटाच्या सर्वच मंत्र्यांनी या बैठकीवर बहिष्कार घातला, त्यानंतर आपल्या मंत्र्यांसह एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन आपली नाराजी व्यक्त केली. दरम्यान, आमच्यातील मतभेद मिटले आहेत, असा दावा केला जात असला तरी हा वाद अजूनही थांबलेला नसल्याचे दिसत आहे. असे असतानाच आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे थेट दिल्लीला रवाना झाले आहेत. शिंदेंच्या या दिल्लीवारीमुळे आता वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे.
मंगळवारच्या घडामोडींनतर, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज दिल्लीत पोहोचले असून अमित शाह यांच्यासह दिल्लीतील वरिष्ठ भाजप नेत्यांची भेट घेणार आहेत. आज मुंबईत पोलिसांबाबत एक कार्यक्रम होता. या कार्यक्रमालाही शिंदे उपस्थित नव्हते. प्राथमिक माहितीनुसार शिंदे केंद्रीय गृहमंत्री तथा केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांची भेट घेणार आहे. राज्यातील नेतृत्त्वाकडून युती धर्माचे पालन केले जात नाही, अशी तक्रार घेऊन शिंदे अमित शाहांकडे जाणार असल्याचे बोलले जात आहे.
दिल्ली दौऱ्यानंतर ते बिहारला जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. कारण, बिहार विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी एकनाथ शिंदे यांनी बिहारमध्ये जाऊन दोन सभा घेतल्या होत्या. त्यामुळे, बिहारमधील एनडीए आघाडीच्या विजयाबद्दल अभिनंदन करण्यासाठी एकनाथ शिंदे बिहारला जाणार असल्याची माहिती आहे.
दरम्यान, एकनाथ शिंदे दिल्लीला रवाना झाल्याचे कळताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची वर्षा निवासस्थानी बैठक झाली. शिवसेना पक्षातील मंत्री आणि एकनाथ शिंदेंची वाढती नाराजी दूर कशी करायची, याबाबत दोन्ही नेत्यांच्या बैठकीत चर्चा झाल्याचे समजते आहे. एकनाथ शिंदे यांची नाराजी वाढतच गेली तर त्यावर तोडगा काय काढायचा याबाबतही बैठकीत चर्चा झाल्याची विश्वसनीय सूत्रांची माहिती आहे. त्यामुळे, महायुतीतमध्ये तीन पक्षात आलबेल नसल्याचे उघड झाले आहे.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा




