मुंबई | Mumbai
राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यावर शिवसेना (शिंदे गट) नेते रामदास कदम यांनी अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. “सुनील तटकरे हे कोणाचेही होऊ शकत नाहीत, ते बेईमान माणूस आहेत,” अशी टीका रामदास कदम यांनी केली. दिवंगत अजित पवारांच्या कथित घातपातामध्ये सुनील तटकरे यांचा हात आहे का, याचीही सखोल चौकशी करण्यात यावी अशी थेट मागणी केली कदम यांनी केली आहे.
रामदास कदम नेमकं काय म्हणाले?
शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी सुनील तटकरे यांच्यावर जोरदार हल्लाबो केला. रामदास कदम म्हणाले, ‘ लोक मला बोलत होते की, तटकरे बेईमान माणूस आहे. हा कोणाचा होणार नाही. नेमकं तसं झालं. त्याची वेळ निघून गेली. विधानसभेच्या निवडणुकीत योगेश कदम यांच्याविरोधात यांनी काम केलं. वैशिष्ट असे आहे की, राष्ट्रवादी, भाजप, शिवसेना अशी युती असताना गुहागरमध्ये भास्कर जाधव यांना मदत केली. त्यांनी थेट ठाकरे गटाला मदत केली. तटकरेंना माझ्यावर बोलण्याचा अधिकार नाही. तू ज्या मेव्हण्याला सांगतो. त्याची माझ्या बाजूला बसायची लायकी नाही’.
विधानसभा निवडणुकीत योगेश कदम यांच्या विरोधात तटकरे यांनी काम केल्याचा आरोपही कदम यांनी केला. “महायुतीमध्ये राष्ट्रवादी, भाजप आणि शिवसेना एकत्र असतानाही गुहागर मतदारसंघात तटकरे यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला आणि भास्कर जाधवांना छुपी मदत केली,” असा दावा रामदास कदम यांनी केला.
पोयनाळ धरणाचे काम रखडल्याने नागरिकांना पाण्यापासून वंचित
कोकणातील धरणांच्या मुद्द्यावरूनही रामदास कदम यांनी तटकरेंवर निशाणा साधला. “कोकणातील १६ धरणांबाबत सुमारे ७० हजार कोटी रुपयांच्या आरोपांचा संदर्भ देत त्यांनी पोयनाळ धरणाचा मुद्दा उपस्थित केला. अनेक वर्षे या धरणाचे काम रखडल्यामुळे १४ गावांतील नागरिकांना पाण्यापासून वंचित राहावे लागले आणि याला संपूर्णपणे तटकरेच जबाबदार आहेत,” असा आरोप त्यांनी केला.
अजितदादांच्या घातपातामध्ये सुनील तटकरे यांचा काही हात आहे का?
रामदास कदम यांच्या या वक्तव्यातील सर्वाधिक गंभीर बाब म्हणजे त्यांनी अजित पवारांच्या कथित घातपाताबाबत व्यक्त केलेला संशय होय. “अजितदादांच्या घातपातामध्ये सुनील तटकरे यांचा काही हात आहे का? या अँगलनेही तटकरेंची कसून चौकशी झाली पाहिजे,” अशी मागणी कदम यांनी केली आहे.महायुतीतील एका ज्येष्ठ नेत्याने दुसऱ्या घटक पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांवर थेट एवढे गंभीर आरोप केल्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. आता या खळबळजनक आरोपांवर सुनील तटकरे काय प्रत्युत्तर देतात, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.




