Monday, November 9, 2026
Homeब्रेकिंग न्यूज'गोकुळ'च्या सत्तेसाठी कोल्हापुरात संघर्षाची ठिणगी! समविचारी आघाडीचा सतेज पाटलांच्या नेतृत्वात महामोर्चा

‘गोकुळ’च्या सत्तेसाठी कोल्हापुरात संघर्षाची ठिणगी! समविचारी आघाडीचा सतेज पाटलांच्या नेतृत्वात महामोर्चा

कोल्हापूर | Kolhapur
कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात ‘गोकुळ’मधील सत्तासंघर्ष आता रस्त्यावर पोहोचला आहे. गोकुळमध्ये शासननियुक्त संचालक नेमण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात काँग्रेस आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली आज, ९ नोव्हेंबर रोजी कोल्हापुरात ‘संघर्ष मोर्चा’ आयोजित करण्यात आला आहे. ऐतिहासिक दसरा चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत निघणाऱ्या या मोर्चात दूध उत्पादक शेतकरी, गोकुळचे सभासद, विविध राजकीय पक्षांचे नेते आणि कार्यकर्ते सहभागी होणार आहेत. दुसरीकडे, शासनाच्या अध्यादेशाला न्यायालयात आव्हान देण्यात आले असून त्यावरही आज सुनावणी होणार आहे. त्यामुळे कोल्हापुरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

गोकुळमधील शासननियुक्त संचालकांच्या नियुक्तीच्या निर्णयाचा निषेध करण्यासाठी समविचारी आघाडीने या मोर्चाचे आयोजन केले आहे. सोमवारी सकाळी दसरा चौकातून मोर्चाला सुरुवात होणार असून व्हीनस कॉर्नर आणि असेंब्ली रोडमार्गे तो जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे.

- Advertisement -

Dharashiv Fire: ऐन दिवाळीत काळाचा घाला! धाराशिवमध्ये भीषण आगीत एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू

मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन आमदार सतेज पाटील यांनी दूध उत्पादक, सभासद आणि कोल्हापूरकरांना केले आहे. माजी खासदार राजू शेट्टी यांच्यासह महाविकास आघाडीतील घटक पक्षांचे स्थानिक नेतेही या आंदोलनात सहभागी होण्याची शक्यता आहे.

मला पण गोकुळवर संचालक म्हणून घ्या
या मोर्चात आता दूध देणाऱ्या म्हशीदेखील सहभागी झाल्याचे पाहायला मिळतेय. म्हशीच्या गळ्यात ‘मला पण गोकुळवर संचालक म्हणून घ्या की असा बॅनर लावण्यात आलाय. तर आणखी एका म्हशीच्या अंगावर ‘गोकूळ वाचवा’ असा संदेश लिहिलाय. गोकुळवर नेमण्यात आलेल्या चार संचालकांपैकी किती लोकांकडे गायी- म्हशी आहेत, असा सवाल म्हैस मालकाने केलाय. त्यामुळे आमची म्हैस पण म्हणते मला पण संचालक म्हणून गोकुळवर घ्या,असा सवाल एका आंदोलकाने केला.

दिवाळीचा सण सुरू असतानाही या मोर्चासाठी पश्चिम महाराष्ट्रासह राज्याच्या विविध भागांतून नागरिक, शेतकरी आणि दूध उत्पादक कोल्हापुरात दाखल होत आहेत. गावागावांतून ट्रॅक्टर, बस आणि खासगी वाहनांनी मोर्चेकरी येत असून, दसरा चौक परिसरात मोठी गर्दी जमू लागली आहे. आमदार सतेज पाटील आणि माजी खासदार राजू शेट्टी यांच्यासह विविध नेत्यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

या मोर्चातील बॅनर आणि फलक विशेष चर्चेचा विषय ठरत आहेत. भाजपचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचा दाखला देत एका फलकावर, ‘एक खासदार कमी होता म्हणून राजीनामा देणारे अटलजी कुठे? आणि एक संचालक कमी आहे म्हणून चार संचालक नियुक्त करणारे कुठे?’ असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे. तसेच, ‘गोकुळचा निर्णय बघितला आणि वाटलं, इंग्रज आणि यांच्यात फरक काय राहिला? भारत स्वतंत्र करण्याची वेळ आलीये,’ अशा आशयाचा मजकूरही फलकावर झळकत आहे.

दरम्यान, मोर्चाच्या पार्श्वभूमीवर दसरा चौक आणि परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. ठिकठिकाणी बॅरिकेडिंग करण्यात आले असून, वाहतुकीतही बदल करण्यात आले आहेत. शासनाने अध्यादेश मागे घेऊन गोकुळची स्वायत्तता अबाधित ठेवावी, ही मोर्चेकऱ्यांची प्रमुख मागणी आहे. त्यामुळे या आंदोलनाकडे आता संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

ताज्या बातम्या

​Nashik News : कौटुंबिक न्यायालयांत वैवाहिक वादांचा डोंगर; ६७ हजारांवर प्रकरणे...

0
नाशिक | भारत पगारे | Nashik महाराष्ट्रातील (Maharashtra) कौटुंबिक न्यायालयांमध्ये (Family Courts) न्यायदानाची प्रतीक्षा करणाऱ्या विवाहित जोडपे आणि याचिकाकर्त्यांची संख्या चिंताजनक पातळीवर पोहोचली...