मुंबई | Mumbai
आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांच्या उपस्थितीत शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या महायुतीची पत्रकार परिषद (Mahayuti Press Conference) आयोजित करण्यात आली होती. यावेळी महायुतीच्या दोन वर्षांच्या कामगिरीच्या रिपोर्ट कार्डचे प्रकाशन करण्यात आले. कालच केंद्रीय निवडणूक आयोगाने (Election Commission) महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांची घोषणा केल्यामुळे आजच्या महायुतीच्या पत्रकारांसोबत संवादाला विशेष महत्त्व होते. निवडणुकांसाठी महायुतीतील घटकपक्षांचे जागावाटप जाहीर होणार का, याकडे राजकीय वर्तुळासह सर्वसामान्यांचे डोळे लागून राहिले होते.मात्र, महायुतीच्या नेत्यांनी जागावाटपावर भाष्य न करता आपल्या सरकारने गेल्या अडीच वर्षांत केलेल्या कामांचा लेखाजोखा सादर करत विरोधकांवर निशाणा साधला.
हे देखील वाचा : मुंबईतील लोखंडवाला येथील बहुमजली इमारतीला भीषण आग; तिघांचा होरपळून मृत्यू
यावेळी मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, “आमची देण्याची नियत आणि उद्देश स्वच्छ आहे. महाविकास आघाडी सरकारने अनेक योजना बंद केल्या होत्या, त्या योजना आमच्या सरकारने चालू केल्या. एका रिपोर्ट कार्डमध्ये मावणार नाहीत एवढी कामे आमच्या सरकारने केली. खोट बोल पण रेटून बोल ही विरोधकांची नीती आहे. विरोधकांना पराभव डोळ्यासमोर दिसत असल्याने ते घाबरले आहेत. आमचे अडीच वर्षातील काम वाखाणण्याजोग आहे. विरोधक गोंधळले असून ते काहीही बोलत आहेत. आम्हाला कॉमनमॅनला सुपरमॅन करायचे आहे. आम्ही प्रगती करणारे असून विरोधक प्रगती रोखणारे आहेत. लोकसभेल त्यांनी फेक नरेटिव्ह पसरवला, त्यामुळे आता त्यांचा जनता करेक्ट कार्यक्रम करणार”, असे त्यांनी म्हटले.
हे देखील वाचा : अजित पवारांनी विरोधकांना फटकारलं; म्हणाले, “आरोप-प्रत्यारोप करताना…”
फडणवीस म्हणाले की, “आमच्यासाठी निवडणुकीचा शंखनाद झाला आहे, काहींसाठी ऐलान. स्थगिती सरकार गेल्यावर गती-प्रगतीचं सरकार आले. शिंदेंच्या नेतृत्वात परिवर्तन योजना, शेतकऱ्यांना ३६५ दिवस -दिवसा वीज मिळणार, साडेआठ रुपयांची वीज आता केवळ तीन रुपयात, शेतकऱ्यांसाठी मागेल त्याला सौरपंप दिले.महाविकास आघाडी सरकारमध्ये ठप्प असलेल्या १४५ सिंचन प्रकल्पांना मान्यता आम्ही मान्यता दिली. अनेक दुष्काळी भागात कामांना सुरुवात केली, अशक्यप्राय नदीजोड प्रकल्प प्रत्यक्षात उतरविले. समाजातील विविध घटकांना सरकारकडून दिलासा देण्यात आला. महामंडळ तयार करून दुर्लक्षित घटकांवर लक्ष केंद्रीत केले. एक लाख तरुणांना उद्योजक बनविण्याचे काम केले, वाढवण बंदर पुढील २५ ते ३० वर्ष अर्थव्यवस्था चालवेल ते मंजूर केले” असे देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnanvis) यांनी सांगितले.
हे देखील वाचा : ५ वर्षात महाराष्ट्रातील सत्ताकारण कसे होते? ३ सरकारं, ३ मुख्यमंत्री, एक व्यक्ती तीनदा उपमुख्यमंत्री अन् बरचं काही…
तर अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले की, “निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. आमच्या समोरची लोकं सातत्याने फेक नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न करत होते. पण सर्व निवडणूक आयोगाच्या हातात असतं. त्यांना स्वायत्ता दिली आहे. उद्धव ठाकरेंचं सरकार गेलं आणि एकनाथ शिंदेंच्या नेतृत्त्वाखाली भाजपा-शिवसेना सरकार अस्तित्वात आलं. वर्षभराने आम्ही (राष्ट्रवादी अजित पवार पक्ष) समाविष्ट झालो. गेले दीड वर्षे सर्वजण काम करतोय. २०२२-२४ चं रिपोर्ट कार्ड देत असातना सातत्याने आमच्याबद्दल सांगितलं जातं की तिजोरी मोकळी केली आहे, कर्जबाजारी झालो आहोत. मी अतिशय जबाबादारीने सांगतोय, निवडणुका जवळ येत असताना खूप कॅबिनेट होतात. तेव्हा अनेक निर्णय घेतले जातात. शेवटी शेवटी काही राहून गेलेले विषय येत असतात. त्यातून विषय मंजूर करतो. काही विचारपूर्वक योजना दिल्या. या योजनांची टिंगळटवाळी झाली, बदनामी करण्याचा प्रयत्न झाला. लाडकी बहीण योजना पॉप्युलर झाली, महिला समाधानी आहेत. सर्व घटकांतील महिलांना न्याय देण्याचा प्रयत्न केला. काहीही बोलण्याचा प्रयत्न होत आहे. आरोप प्रत्यारोप करण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे. पण काहीतरी तारतम्य ठेवण्याची गरज आहे”, असे त्यांनी म्हटले.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा