मुंबई | Mumbai
राज्यातील महायुती सरकारमधील आणखी एका मंत्र्यांचा राजीनामा पडला आहे. नाशिकमधील सदनिका घोटाळा प्रकरणात दोषी आढळेल्याने माणिकराव कोकाटे यांना राजीनामा द्यावा लागला आहे. काल संध्याकाळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राजीनामा मंजूर केल्यानंतर त्यांनी राज्यापालांकडे राजीनामा सुपुर्द केला होते. आज अखेर राज्यपालांनी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा मंजूर केला आहे.
शासकीय सदनिका घोटाळ्या प्रकरणी नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाचा निर्णय विरोधात गेल्यानंतर आणि विरोधकांसोबत भाजपकडून दबाव वाढल्यानंतर माणिकराव कोकाटे यांच्याकडील खाती काढून घेण्यात आली होती. मात्र तरीही विरोधकांचा दबाव वाढल्याने गुरुवारी अखेर माणिकराव कोकाटे यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा अजित पवार यांच्याकडे सुपूर्द केला. अजित पवार यांनी कोकाटे यांच्या राजीनाम्याची प्रत मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे सादर केली. मुख्यमंत्र्यांनी राजीनामा राज्यपालांकडे सुपुर्द केल्यानंतर आज अखेर राज्यपालांनी राजीनामा स्विकारला आहे.
विजय कोकाटें विरोधात अटक वॉरंट जारी
दरम्यान, या प्रकरणात माणिकराव कोकाटे यांच्यासह त्यांचे बंधू विजय कोकाटे यांच्याविरोधातही अटक वॉरंट जारी करण्यात आले आहे. विजय कोकाटे सध्या कुठे आहेत, याबाबत कोणतीही ठोस माहिती उपलब्ध नसल्याने नाशिक पोलिसांनी त्यांचा शोध सुरू केला आहे.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा




