मुंबई | Mumbai
गेल्या काही दिवसापासून महायुतीचा (Mahayuti) नाशिकसह इतर जागांवरील तिढा अडल्याचे पाहायला मिळत आहे. यामध्ये उत्तर पश्चिम मुंबई लोकसभेच्या (North West Mumbai Lok Sabha) जागेचा देखील समावेश होता. मात्र, आता या जागेचा तिढा सुटला असून ही जागा शिंदेंच्या शिवसेनेच्या (Shinde Shivsena) वाट्याला गेली आहे. या मतदारसंघातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या शिवसेनेकडून आमदार रवींद्र वायकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
वायकर यांच्या उमेदवारीला भाजप आणि मनसेचा विरोध होता. त्यामुळे ही जागा रखडल्याचे बोलले जात होते. यानंतर आता त्यांच्या उमेदवारीला विरोध मावळल्यामुळे महायुतीचा उत्तर पश्चिम मुंबई लोकसभेचा तिढा सुटला आहे. आमदार रवींद्र वायकर (MLA Ravindra Waikar) हे जोगेश्वरी भूखंड घोटाळा प्रकरणामुळे ईडीच्या (ED)रडारवर होते. नुकतेच काही महिन्यांपूर्वी वायकर यांनी ठाकरेंच्या शिवसेनेला रामराम ठोकत शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यानंतर आता त्यांना उत्तर पश्चिम मुंबईतून लोकसभेच्या रिंगणात उतरवण्यात आले आहे.
दरम्यान, यानंतर आता वायकर यांचा सामना ठाकरेंच्या शिवसेनेचे (Thackeray Shivsena) उमेदवार अमोल कीर्तिकर (Amol Kirtikar) यांच्याशी होणार आहे. अमोल कीर्तिकर हे शिंदेंच्या शिवसेनेचे विद्यमान खासदार गजानन कीर्तिकर यांचे चिरंजीव असून त्यांची लढत एकेकाळी उद्धव ठाकरेंचे विश्वासू असलेल्या रवींद्र वायकर यांच्याशी होणार आहे. त्यामुळे आता उत्तर पश्चिम मुंबई मतदारसंघातून नेमकं कोण बाजी मारतो? हे पाहणे महत्वाचे असणार आहे.