Wednesday, February 4, 2026
Homeब्रेकिंग न्यूजMahayuti: ठाकरे बंधुंना शह देण्यासाठी महायुतीचा प्लॅन बी तयार? मुंबईसह प्रमुख महापालिकांसाठी...

Mahayuti: ठाकरे बंधुंना शह देण्यासाठी महायुतीचा प्लॅन बी तयार? मुंबईसह प्रमुख महापालिकांसाठी काय असणार स्ट्रॅटेजी

मुंबई | Mumbai
मागील ३ वर्षापासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे वेध सर्वच राजकीय पक्षांना लागले आहे. त्यात मुंबई, ठाणे, नाशिक, पुणे यासारख्या प्रमुख महापालिका निवडणुकीसाठी इच्छुकांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. त्यातच तब्बल दोन दशकानंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचे मनोमिलन झाले. त्यानंतर शिवसेना आणि मनसेच्या युतीच्या जोरदार चर्चा सुरू झाल्या आहेत. ठाकरे बंधू एकत्र आले तर महायुतीचे टेन्शन वाढणार आहे. त्यामुळे ठाकरे बंधू एकत्र आले तर काय करायचे? याचा प्लॅन महायुतीकडून करण्यात आल्याचे समोर आले आहे.

गेल्या वर्षी पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीने दमदार यश मिळवले होते. त्यानंतर आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. परंतु या निवडणुकीपूर्वी राज्यातील राजकीय समीकरण बदलणार का अशी चर्चा सुरू आहे. मराठीच्या मुद्द्यावर पहिल्यांदाच उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यातील दुरावा कमी झाल्याचे चित्र दिसून आले आहे. त्यात राज-उद्धव यांच्या एकीमुळे मनपा निवडणुकीत फटका बसण्याची धास्ती महायुतीला लागली आहे. त्यामुळे मुंबईत एकत्रित लढण्याची तयारी महायुतीने केली आहे.

- Advertisement -

महायुतीचा प्लॅन बी तयार
शिवसेना-मनसे एकत्र आली तर मतांचे विभाजन टाळण्यासाठी महायुतीने प्लॅन बी तयार केल्याची माहिती मिळत आहे. मुंबईसह प्रमुख महानगरपालिका निवडणुका महायुती म्हणून एकत्र लढवण्याचा निर्णय घेतला जाईल. मुंबई पालिकेतील गेल्या अनेक वर्षांपासूनचा ठाकरे कुटुंबाचा कारभार उघड करण्याचाही महायुतीचा प्लॅन असेल. त्याशिवाय मिळालेल्या माहितीनुसार, कोकणी मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी गणेशोत्सव काळात मोफत ट्रेन्स आणि एसटी बसेस सोडण्याचा विचार आहे. गोविंदा पथके आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना महायुतीशी जोडण्याचाही प्रयत्न होणार आहे. प्रत्येक वॉर्डची जबाबदारी आमदारांकडे देत सणासुदीच्या काळात जनतेपर्यंत पोहोचण्याची रणनीती आखली जात आहे. अद्याप महापालिका निवडणुका घोषित झाल्या नसल्या तरी प्रत्येक राजकीय पक्ष आपापल्या परीने मतदारसंघाची बांधणी करत आहे. इच्छुकांची भाऊगर्दी, बंडखोरी टाळण्यासाठी महायुती मुंबई वगळता इतर महापालिका निवडणुकीत स्वबळावर लढणार आहे.

YouTube video player

‘नो रिस्क’ धोरण काय आहे?
शिवसेना-मनसे एकत्र आल्यास देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंकडून नो रिक्स धोरण अवलंबले जाऊ शकते, असे सांगण्यात येत आहे. प्रमुख महापालिका निवडणुकीत महायुती म्हणून निवडणूक लढण्याचा विचार करण्यात येत आहे. मतांचे विभाजन होणार नाही याची काळजी महायुती घेणार आहे. ठाकरेंना फायदा होऊ नये यासाठी मुंबईसह प्रमुख महानगर पालिका महायुती एकत्र लढणार आहेत.

मात्र, एकीकडे मुंबई वगळता इतर महापालिका निवडणुकीत महायुती होण्याची शक्यता फार कमी आहे. ठाणे, पुणे, नाशिक सारख्या महापालिकांमध्ये भाजपाचा स्वबळावर निवडणूक लढवण्याचा इरादा आहे. याठिकाणी होणारी बंडखोरी लक्षात घेऊन भाजपा आणि मित्रपक्ष वेगवेगळे निवडणूक लढण्याची शक्यता आहे. परंतु मुंबईत महायुतीला कुठलाही धोका पत्करायचा नाही. मुंबईत ठाकरे बंधू एकत्रित आले तर त्याचा मतांवर परिणाम होईल त्यामुळे महायुती सावध भूमिका घेत आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

ताज्या बातम्या