नागपूर | प्रतिनिधी Nagpur
आगामी महापालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुका महायुती म्हणून एकत्र लढवल्या जाणार असल्याची घोषणा भाजपचे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक प्रभारी चंद्रशेखर बावनकुळे यान यांनी बुधवारी विधानभवन परिसरात प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना केली. आम्ही ५१ टक्के मतांचा आकडा गाठून विजय मिळवण्याचे ध्येय ठेवले असल्याचेही त्यांनी जाहीर केले.
राज्यात लवकरच मुंबईसह २९ महापालिका आणि ३२ जिल्हा परिषदांच्या निवडणुकीचे बिगुल वाजणार आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थिती एक महत्त्वाची बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत झालेल्या निर्णयांची माहिती बावनकुळे यांनी दिली.
जिल्हा पातळीवरील सर्व नेत्यांना स्थानिक स्तरावर महायुतीची बांधणी पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. स्थानिक पातळीवर ५ ते १० टक्के जागांवर काही अडचणी येऊ शकतात. मात्र त्या ठिकाणी देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे स्वतः बसून अंतिम निर्णय घेतील, असे बावनकुळे म्हणाले.
मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी महायुती सज्ज झाली आहे. शिवसेनेने ९० ते १०० जागांची मागणी केली असली तरी, जागावाटपाचा निर्णय तांत्रिक बाबी तपासून घेतला जाईल. यासाठी भाजपचे आणि शिवसेनेचे प्रत्येकी चार पदाधिकारी तसेच महायुतीचे प्रतिनिधी यांची समिती एकत्र बसून चर्चा करेल. जिथे मतभेद होतील तिथे वरिष्ठ नेते तोडगा काढतील. तसेच, मुंबईच्या महापौरपदाचा निर्णय फडणवीस, शिंदे आणि अजित पवार हे तिघे मिळून घेतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
अजित पवार हे महायुतीचा अविभाज्य भाग असून ते आगामी लढाही सोबतच देणार आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मागील निवडणुकांमध्ये काही ठिकाणी कार्यकर्त्यांमध्ये मतभेद झाले होते. मात्र, ते आता पूर्णपणे दूर झाले आहेत. आमच्यात मनभेद नव्हते, केवळ निवडणूकनिहाय मतभेद होते, असेही बावनकुळे यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात स्पष्ट केले.




