Friday, September 11, 2026
Homeब्रेकिंग न्यूजमका प्रक्रिया उद्योगामुळे शेतकऱ्यांसाठी विश्वासार्ह आणि शाश्वत बाजारपेठ उपलब्ध होणार - मंत्री...

मका प्रक्रिया उद्योगामुळे शेतकऱ्यांसाठी विश्वासार्ह आणि शाश्वत बाजारपेठ उपलब्ध होणार – मंत्री छगन भुजबळ

येवला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन

- Advertisement -

नाशिक, दि. 11 सप्टेंबर (जिमाका वृत्तसेवा) : जिमाका वृत्तसेवा

चिंचोंडी औद्योगिक वसाहतीमध्ये सुखजित बायोकॉर्न लिमिटेडकडून सुमारे रूपये ७६० कोटींची गुंतवणूक असलेला अत्याधुनिक कृषी-आधारित अन्नप्रक्रिया उद्योग उभारण्यास मंजुरी मिळाली आहे. या प्रकल्पामुळे जिल्ह्यातील मका उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठी, विश्वासार्ह व शाश्वत बाजारपेठ उपलब्ध होणार आहे, असे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक सरंक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केले.

येवला कृषि उत्पन्न बाजार समिती येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी भवन व पार्किंग शेडची उभारणी करणे व इतर विकासकामांचे भूमिपूजन मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते आज पार पडले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी खासदार भास्कर भगरे, माजी खासदार समीर भुजबळ, माजी आमदार मारोतीराव पवार, उप विभागीय अधिकारी बाबासाहेब गाढवे, तहसीलदार आबा महाजन, येवला नगरपालिकेचे मुख्याधिकारी तुषार आहेर, तालुका कृषि अधिकारी शुभम बेरड, गटविकास अधिकारी संदीप वायाळ, येवला नगराध्यक्ष राजेंद्र लोणारी, येवला बाजार समितीचे सभापती वसंत पवार, उपसभापती रतन बोरनारे, येवला कृषि उत्पन्न बाजार समितीचे सचिव कैलास व्यापारे, संचालक मंडळ, यांच्यासह पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी व शेतकरी उपस्थित होते.

मंत्री श्री.भुजबळ म्हणाले की, हा प्रकल्प केवळ एक उद्योग नसून शेतकऱ्यांच्या उत्पादनाला स्थानिक आणि शाश्वत बाजारपेठ उपलब्ध करून देणारा प्रकल्प आहे. या प्रकल्पाची दररोज सुमारे १२०० मेट्रिक टन मका प्रक्रिया करण्याची क्षमता प्रस्तावित आहे. मक्यापासून स्टार्च तसेच स्टार्चवर आधारित विविध मूल्यवर्धित उत्पादने तयार केली जाणार आहेत. या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात दरवर्षी सुमारे ३.५० लाख मेट्रिक टन मक्याची मागणी निर्माण होण्याची अपेक्षा आहे. यामुळे येवल्यासह नाशिक जिल्ह्यातील मका उत्पादक शेतकऱ्यांसाठी हक्काची बाजारपेठ उपलब्ध होणार आहे. चिचोंडी औद्योगिक वसाहतीतील मका प्रक्रिया उद्योगामुळे ५० हजाराहून अधिक मका उत्पादक शेतकऱ्यांना होणार फायदा होणार आहे. येवला बाजार समितीत कृषि भवन मंजूर करण्यात आले आहे. यासाठी १५ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहे.. त्याचप्रमाणे येथे माथाडी भवन निर्माण करण्यासाठी बाजार समितीने प्रस्ताव तातडीने पाठवावा, असे त्यांनी सांगितले.

शेतीसमोर अनेक आव्हाने आहेत. हवामान बदल, उत्पादन खर्च, बाजारभाव, साठवणूक, प्रक्रिया आणि बाजारपेठ या सर्व प्रश्नाांकडे व्यापक दृष्टिकोनातून पाहण्याची गरज आहे. शेतकऱ्याला केवळ उत्पादन करणारा नव्हे, तर आपल्या उत्पादनाला मूल्यवर्धन करून अधिक उत्पन्न मिळवणारा उद्योजक बनवायचे आहे. शेतकरी कष्ट करून मका, कांदा, सोयाबीन, भाजीपाला, धान्य आणि विविध पिकांचे उत्पादन घेतो. केवळ उत्पादन वाढवणे पुरेसे नाही. उत्पादनाला बाजारपेठ, बाजारपेठेला प्रक्रिया उद्योग आणि प्रक्रियेला देश-विदेशातील बाजारपेठ मिळणे आवश्यक आहे. आज जगभरात अन्नप्रक्रिया उद्योगाला मोठी संधी आहे. त्यामुळे येवला तालुक्यातील शेतीला जर आधुनिक अन्नप्रक्रिया उद्योगाची जोड मिळाली, तर शेतकऱ्याच्या उत्पादनाचे मूल्य वाढेल, स्थानिक अर्थव्यवस्था मजबूत होईल आणि रोजगाराच्या संधी निर्माण होतील. या प्रकल्पामुळे रोजगाराच्या अनेक संधी निर्माण होण्याची अपेक्षा आहे. याचा फायदा केवळ कारखान्यात काम करणाऱ्या युवकांना होणार नाही, तर वाहतूक, लॉजिस्टिक्स, पॅकेजिंग, दुरुस्ती-देखभाल, कृषी माल पुरवठा, सेवा क्षेत्र आणि इतर पूरक व्यवसायांनाही होणार असल्याचे मंत्री श्री.भुजबळ यांनी सांगितले.

येवला शहराचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी येसगाव पाणी पुरवठा योजना मंजूर करण्यात आली आहे. मनमाड येवला कोपरगाव रस्त्याचे चौपदरी काँक्रीटीकरण, येवला पिंपळस रस्त्याचे चौपदरी काँक्रीटीकरण, येवला बायपास रस्ता, लासलगाव पाटोदा नगरसुल रस्ता काँक्रीटीकरण, येवला अडतीस गाव योजनेसाठी वाढीव सौर ऊर्जा प्रकल्प यासारखी अनेक कामे मंजूर करण्यात आली आहे. तसेच अनेक कामे प्रगतीपथावर आहेत. बाजार समितीनेही बदलत्या काळासोबत पुढे जावे. आजच्या काळात कृषी उत्पन्न बाजार समित्यांनीही पारंपरिक पद्धतीच्या पुढे जाऊन आधुनिक बाजारव्यवस्थेचा स्वीकार करणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांना चांगली बाजारपेठ, साठवणूक, पॅकिंग, ग्रेडिंग, वजनकाटा, पारदर्शक व्यवहार, डिजिटल सुविधा आणि बाजारभावाची अचूक माहिती मिळाली पाहिजे. शेतकऱ्याला त्याच्या मालाचा योग्य मोबदला मिळणे हा विकासाचा खरा मापदंड आहे. त्यामुळे येवला कृषी उत्पन्न बाजार समितीनेही पुढील काळात शेतकरी केंद्रित, आधुनिक आणि पारदर्शक बाजारव्यवस्था उभी करण्यासाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन मंत्री भुजबळ यांनी यावेळी केले.

आचार्य विनोबा भावे यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन करत त्यांचा विचार केवळ जमीन वाटपापुरता मर्यादित नव्हता. तर जमीन, श्रम, उत्पादन आणि समाज यांचा संबंध माणुसकीच्या आणि सहकार्याच्या भावनेतून असावा, हा त्यांच्या विचाराचा गाभा होता. तसेच राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी ग्रामविकासाला अत्यंत महत्त्व दिले. त्यांनी ‘गाव घडले तर देश घडेल’ या भावनेतून ग्रामीण समाजाला जागृत करण्याचे काम केले. श्रमाची प्रतिष्ठा, स्वावलंबन, स्वच्छता, शिक्षण, व्यसनमुक्ती आणि ग्रामविकास यांचा संदेश त्यांनी दिला असल्याचे सांगितले.

ताज्या बातम्या

पुढील ‘विश्व मराठी साहित्य संमेलन’ लंडनमध्ये – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदें यांची...

0
मुंबई / प्रतिनिधी Mumbaiजगभरात विखुरलेल्या मराठी बांधवांना, उद्योजकांना आणि मराठी संस्कृतीला एका वैश्विक व्यासपीठावर आणण्यासाठी पुढील 'विश्व मराठी साहित्य संमेलन' लंडनमध्ये आयोजित करण्यात येईल,...