नाशिक । प्रतिनिधी Nashik
विधानसभा निवडणुकीत जसे अभूतपूर्व घवघवीत यश मिळविले तसेच यश आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही मिळवू असा विश्वास व्यक्त करुन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांंनी आज विधानसभा निवडणुकीत झालेल्या विजयात नाशिककरांचे मोठे योगदान असल्याचेे सांगून विजयाचे श्रेय नाशिकच्या मतदारांना दिले.त्याचवेळी त्यांनी महाविकास आघाडीवर खरपूस टिकाही केली.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आज आभार दौरा यात्रेनिमित्त हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर जाहीर सभा झाली.या सभेला मंत्री गुलाबराव पाटील, दादा भुसे,आ.सुहास कांंदे यांंच्यासह विविध नेते उपस्थित होते. सभेला जवळपास तीन तास उशीर झाला.तत्पूर्वी झालेल्या सर्व भाषणांमध्ये नेत्यांनी शिंदे यांचे तोंड भरून कौतुक केले. राज्यात लाडकी बहीण योजनेने क्रांंती घडवली. या योजनेमुळेच महाराष्ट्रात पुन्हा एकदा महायुतीचे सरकार आले. अभुतपुर्व यश महायुतीला मिळाले,असे ते म्हणाले.
यावेळी शिंदे पुढे म्हणाले की, ज्या विश्वासाने जनतेने आम्हाला घवघवीत यश मिळवून दिले. त्या जनतेच्या विश्वासाला कदापी तडा जाऊ देणार नाही. मी मुख्यमंत्री असतांनाच म्हणालो होतो की, येत्या निवडणुकीत 200 जागा जिंकू आणि त्या जिंकून दाखवल्या. खरी आणि खोटी शिवसेना कोणती हे जनतेने दाखवून दिले. अडीच वर्षात जे अहोरात्र काम केले. त्याची पावती जनतेने दिली. लाडक्या बहिणी व भावांचे प्रेम कामी आले.आगामी काळात नाशिकचा जीडीपी एक लाख 36 हजार कोटीवरुन दोन लाख 75 हजार कोटीवर न्यायचा आहे. सिंहस्थ कुंंभमेळा यशस्वी करुन दाखवायचा आहे. त्यासाठी आशिर्वाद हवे आहेत. विरोधकांनी कितीही टिका केली, शिव्या दिल्या तरी आम्ही घाबरणार नाही.
यावेळी त्यांनी उध्दव ठाकरे यांचे नाव न घेेता टिका केली. आम्हाला शिव्या देण्यापेक्षा आत्मपरीक्षण करा. आत्मचिंतन करा, कंपाऊंडरकडून पोटदुखीचे औषघ घेण्यापेक्षा आमच्या बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाण्यातून औषध घ़्या.आमच्या वाटेत अडथळे आणण्याऐवजी स्व:ताचा मार्ग प्रशस्त करा,असे ते म्हणाले.
यावेळी गुलाबराव पाटील,मिना कांबळे, ज्योती वाघमारे, भाऊसाहेब चौधरी,विजय करंजकर, अजय बोरस्ते, भाऊलाल तांबडे, दातीर यांचे भाषण झाले. दादा भुसे यांनी प्रास्ताविक केले. सीमा पेठकर यांनी सुत्रसंचालन केले. त्यानंंतर विविध क्षेत्रातील कार्यकत्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. , महानगरप्रमुख प्रवीण तिदमे, राजू लवटे , गणेश कदम आदीसह पदाधिकारी उपस्थित होते.