Thursday, August 20, 2026
Homeब्रेकिंग न्यूजAccident : बस आणि ट्रकचा अपघात; दोन महिला ठार; १० प्रवाशांची प्रकृती...

Accident : बस आणि ट्रकचा अपघात; दोन महिला ठार; १० प्रवाशांची प्रकृती गंभीर

मालेगाव | प्रतिनिधी Malegaon

- Advertisement -

नाशिक येथून चाळीसगावकडे भरधाव जात असलेली एस.टी. बस समोरून येत असलेल्या भरधाव आयशर ट्रकवर जावून आदळल्याने झालेल्या भीषण अपघातात बसमधील दोन महिला जागीच ठार झाल्या तर बसचालक-वाहकासह ३२ प्रवाशी जखमी झाले. यामध्ये १० ते १२ प्रवाशी गंभीररित्या जखमी झाले असून त्यांच्यावर सामान्य व खाजगी रूग्णालयांमध्ये उपचार केले जात आहे. अपघातग्रस्त दोन्ही वाहनांचा अक्षरश: चुराडा झाला आहे. मालेगाव-चाळीसगाव रस्त्यावर बोधे फाट्यालगत सकाळी सव्वादहा वाजेच्या सुमारास ही घटना घडली.

दरम्यान, चालकाचे वेगावर नियंत्रण नसल्याने हा अपघात घडल्याचे प्रत्यक्षदर्शी नागरीकांतर्फे सांगितले गेले. या अपघाताचे समजलेले वृत्त असे की, नाशिक-चाळीसगाव बस क्र. एम.एच.-४०-वाय-५८२२ ही मालेगाव बसस्थानकातून चाळीसगावकडे मार्गस्थ झाली होती. बसमध्ये ४० पेक्षा अधिक प्रवाशी असल्याचे समजते. सव्वादहा वाजेच्या सुमारास भरधाव बस बोधे फाट्यालगत चाळीसगावहून मालेगावकडे भरधाव वेगात येत असलेल्या आयशर ट्रक क्र. एम.एच.-१९-सी.वाय.-८५२५ वर जावून आदळली. दोन्ही वाहने कमालीच्या वेगात असल्याने धडक होताच दोन्ही वाहनांच्या दर्शनी भागांचा अक्षरश: चुराडा झाला तर या जबर धडकेनंतर आयशर ट्रक अक्षरश: रस्त्याच्या कडेला जावून उलटला. धडकेनंतर बसच्या दर्शनी भागाचा अक्षरश: चुराडा होण्यासह आतील सर्व सीट अक्षरश: उखडून गेल्या होत्या. यामुळे आम्ही देखील फेकले जावून जखमी झाल्याचे प्रवाशांनी सांगितले.

या अपघातात बसमधील सखुबाई किरण माळी (७८, रा. आडगाव, ता. एरंडोल), इरशाद शेख रमजान (६०, रा. नाचनखेडे, ता. जामनेर) या दोन्ही वृध्द प्रवाशी महिला गंभीररित्या जखमी झाल्याने जागीच गतप्राण झाल्या.

तर प्रणिता विनोद ततार (४७), राजेंद्र जगन्नाथ ततार (६३), आशा राजेंद्र ततार (५७, सर्व रा. संगमेश्वर, मालेगाव), ऋतुजा शुभम सोनजे (२४, रा. नाशिक), अरमान नजीम पिंजारी (३५, सोयगाव), गोकुळ रामदास भामरे (६५), सुनंता गोकुळ भामरे (६०, रा. नाशिक), सुहाना हरिसा (१९), निधा अजीसा (६६, रा. मालेगाव), रत्नाबाई नाना अहिरे (६०, रा. टिंगरी, ता. मालेगाव), छाया मोरे (५०, टाकळी), सविता मोरे (४०, टाकळी), सुनीता मोरे (४५), अलका जाधव (४७, वाघळी), किशोर पाटील (४५, भडगाव), छाया भामरे (४५, भडगाव), रत्नाबाई अहिरे (६०), संतोष जाधव (४५, पिंपळनेर), अनीता बच्छाव (४०, मेहुणे), सरला अहिरे (५०, दसेगाव), राजेंद्र सोनवणे (५५, वळवाडी), अशोक चौधरी (६३, पिंपरखेड), देविदास मिटकर (७२, देवळा), सुनीता अहिरे (४३, रामतीर), केशव माळी (७६), इंदुबाई माळी, सुरेश मेटकर (६५, देवळा), सुरेश चव्हाण (३२, चाळीसगाव), संजय भिडे (५०, चाळीसगाव) या प्रवाशांसह बसचालक योगेश चिमणकर (४१) व वाहक जनार्दन भुसारे (३४, सुरगाणा) हे जखमी झाले असून त्यांच्यावर सामान्य रूग्णालयासह खाजगी रूग्णालयात उपचार केले जात आहे.

बस व आयशरची धडक होताच परिसरातील नागरीकांनी घटनास्थळी धाव घेतली. या अपघाताची माहिती मिळताच तहसीलदार विशाल सोनवणे, मालेगाव आगार प्रमुख विजय पाटील, पोलीस उपनिरीक्षक तुषार भदाणे यांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. जखमी झालेल्या बसमधील प्रवाशी व आयशर चालकास तातडीने रूग्णवाहिकांव्दारे मालेगावी सामान्य रूग्णालय व खाजगी रूग्णालयांमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले.

रस्त्यावर घडलेल्या या अपघातामुळे मालेगाव-चाळीसगाव रस्त्यावरील दोन्ही बाजुंची वाहतूक ठप्प होवून वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. पोलिसांनी स्थानिक नागरीकांच्या मदतीने दोन्ही अपघातग्रस्त वाहने रस्त्यावरून बाजुला करत वाहतूक सुरळीत केली. या अपघात प्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रस्ता बनला मृत्यूचा सापळा
मालेगाव-चाळीसगाव रस्ता सातत्याने घडत असलेल्या अपघातांच्या घटनांमुळे मृत्यूचा सापळा बनला असल्याची संतप्त प्रतिक्रिया ग्रामस्थांनी व्यक्त केली. प्रमुख मार्ग असल्याने या रस्त्यावर वाहनांची वर्दळ देखील वाढली आहे. रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वळणे असतांना देखील गतीरोधकाअभावी वाहने सुसाट वेगाने जात असल्याने सातत्याने अपघाताच्या घटना घडत असून अनेकांचा बळी गेला आहे. त्यामुळे अपघातावर नियंत्रणासाठी या मार्गावर तातडीने उपाययोजना करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली.

ताज्या बातम्या

आडगाव भूसंपादन प्रकरणात मनपाला मोठा झटका; मनपाचे बँक खाते सील करण्याचे...

0
नाशिक | प्रतिनिधी Nashik आडगाव येथील भूसंपादन प्रकरणात न्यायालयाने नाशिक महापालिकेला मोठा धक्का दिला आहे. जमीनमालकाला मंजूर झालेला सुमारे १८ कोटी रुपयांचा वाढीव मोबदला अदा...