पाथर्डी |तालुका प्रतिनिधी| Pathardi
मार्च महिन्यात झालेल्या दहावी परीक्षेत नापास झालेल्या विद्यार्थ्यांसंदर्भात पाथर्डी शहरात गैरप्रकार उघडकीस आल्याची गंभीर बाब समोर आली आहे. शिक्षण विभागातील काही अधिकारी व कर्मचार्यांच्या निष्क्रियतेमुळे हा प्रकार दीर्घकाळ दडपला गेल्याचा आरोप होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गटशिक्षणाधिकारी परीक्षा केंद्रावर तपासणीसाठी येणार असल्याची माहिती मिळताच सुमारे 11 संशयित विद्यार्थी मागच्या दारातून पळून गेल्याचा प्रकार घडला. यामुळे परीक्षा केंद्रावर गोंधळ निर्माण झाला. तालुक्यातील अनेक विद्यार्थ्यांनी बनावट नावाने परीक्षा दिल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. तसेच काही ठराविक विद्यालयांकडून विद्यार्थ्यांना पास करून देतो या नावाखाली आर्थिक व्यवहार होत असल्याचेही आरोप करण्यात येत आहेत.
पाथर्डीतील परीक्षा केंद्रावर सुमारे 200 ते 250 विद्यार्थी परीक्षा देत असून, कोरडगाव, अकोला, मिरी, खरवंडी परिसरासह शहरातील विद्यार्थ्यांचा समावेश असल्याचे सांगण्यात येते. काही प्रकरणांमध्ये बनावट हॉलतिकीट व आधारकार्ड तयार करून परीक्षा दिल्याचेही समोर आले आहे. दरम्यान, काही विद्यार्थ्यांचे बनावट ओळखपत्र सोशल मीडियावर समोर आल्याने प्रकरण अधिक गंभीर झाले आहे. याबाबत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. आनंद भंडारी यांना माहिती देण्यात आली. त्यानंतर त्यांनी तत्काळ माध्यमिक शिक्षण विभागाला कारवाईचे निर्देश दिले. सूचनांनुसार गटशिक्षणाधिकारी शिवाजी कराड यांनी परीक्षा केंद्रावर भेट दिली असता, काही विद्यार्थ्यांनी पळ काढल्याचे समोर आले. तपासणीदरम्यान तीन विद्यार्थ्यांना कॉपी करताना पकडण्यात आले असून त्यांच्यावर कॉपी केस दाखल करण्यात आल्या आहेत.
गटशिक्षणाधिकारी केंद्रावर पोहोचण्यापूर्वीच काही विद्यार्थ्यांना याची माहिती मिळाल्याने ते पळून गेल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. त्यामुळे परीक्षा प्रक्रियेतील गुप्तता आणि प्रशासनाच्या कारवाईबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
परीक्षा सुरू असताना अचानक 75 विद्यार्थ्यांना बसण्याची परवानगी कशी देण्यात आली, बनावट विद्यार्थ्यांना हॉलतिकीट कसे मिळाले, आणि संबंधित विद्यालयांवर कोणती कारवाई होणार याबाबत शिक्षण विभागाकडून स्पष्ट उत्तराची मागणी होत आहे.




