पारनेर |तालुका प्रतिनिधी| Parner
मेजर सीता शेळके व त्यांच्या लष्करी टीमने 31 तास मेहनत करत केरळ राज्यातील वायनाडमध्ये 190 फुटांचा लोखंडी पूल उभा केला आहे. या पुलामुळे हजारो पूरग्रस्तांना आरोग्यासह इतर मदत करता आली. पारनेर तालुक्यातील बोंद्रे गावातील टाकळीढोकेश्वर येथील जवाहर नवोदय विद्यालयात इयत्ता बारावीपर्यंत शिक्षण घेतल्यानंतर मेजर शेळके या 2012 मध्ये लष्करात दाखल झाल्या. त्यांनी चेन्नईच्या लष्कराच्या मुख्यालयात प्रशिक्षण घेतले. त्यांची नियुक्ती लष्कराच्या मद्रास इंजिनिअरिंग ग्रुप अर्थात मद्रास सॅपर्समध्ये झाली. अवघड व दुर्गम भागात लष्कराला पोहोचण्यासाठी सुविधा उपलब्ध करून देण्याचे काम या सॅपर्सकडे असते.
मंगळवारी (दि.30) रात्री केरळ राज्यातील वायनाडमध्ये भूस्खलनानंतर चुरामला येथे संपर्क तुटलेल्या मुंदकाईपर्यंत मदत पोहोचविण्यासाठी तातडीने पूल उभारणे गरजेचे होते. लष्कराच्या मद्रास सॅपर्सच्या प्रमुख असणार्या मेजर शेळके व 70 जणांची टीम यासाठी कार्यरत झाली. डोंगराचा मोठा भाग या मुंदकाई गावावर पडला होता. अतिवृष्टीमुळे पुराचा फटका मोठ्या प्रमाणावर बसला होता. त्यामुळे मुंदकाईवर शब्दशः आभाळ कोसळले होते. गावात जाण्यासाठीचा पूलही या प्रलयात वाहून गेला होता. त्यामुळे जगाशी संपर्क तुटला.
मदत व बचाव कामासाठी तेथे जाण्याची कोणतीच सुविधा नसताना मद्रास सॅपर्सने हे काम हाती घेतले. मेजर शेळके यांनी टीमसोबत 31 तास क्षणभराचीही विश्रांती न घेता 19 पोलादी पॅनल्सच्या मदतीने हा पूल उभारला. त्यावरून बुलडोझर, जेसीबीसारखी अवजड यंत्रसामग्री, रुग्णवाहिका तातडीने मुंदकाईकडे रवाना झाला. मेजर शेळके यांची पुलाची उभारणी करतानाची छायाचित्रे सोशल मीडियावर प्रकाशित झाली. त्या केवळ केरळातच नव्हे तर संपूर्ण देशात हिरो ठरल्या.
संरक्षण मंत्रालयाकडून अभिनंदन
भारतीय लष्कर आणि भारतीय वायूसेनेने अगदी कमी कालावधीत वायनाड येथील आपत्तीग्रस्तांच्या मदतीसाठी 190 फूट लांबीचा एक तात्पुरता बेली ब्रिज निर्माण केला. प्रतिकूल परिस्थितीत मेजर शेळके यांनी महिला सक्षमीकरण आणि टीमवर्कचे प्रदर्शन केले. याबाबत सामाजिक माध्यमातून ट्विट करत संरक्षण मंत्रालयाचे प्रवक्ते ए. भारतभूषण बाबू यांनी मेजर शेळके व मेजर अनिष व त्यांच्या टीमचे अभिनंदन केले.
मेजर सीताचा मला अभिमानच…
केरळ राज्यातील वायनाड मध्ये भूस्खलनानंतर माझी मुलगी मेजर सीता शेळके व त्यांच्या 70 जणांच्या लष्करी टीमने रात्रंदिवस मेहनत करत लोखंडी पूल उभा केला. यातून जनतेला सर्व सोयी-सुविधा व मदत शासनाच्या माध्यमातून उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे या संकटकाळी सर्वसामान्यांना कर्तव्याच्या माध्यमातून मदतीचा हात दिला. ही माझ्यासाठी अभिमानाची व गौरवाची बाब असल्याची प्रतिक्रिया मेजर गीता शेळके यांचे वडील अॅड. अशोक शेळके यांनी व्यक्त केली.