Saturday, November 2, 2024
Homeब्लॉगअशी करा सजावट

अशी करा सजावट

घरामध्ये सजावटीसाठी आपण वेगवेगळी झाडे लावू शकतो. घरात लावलेल्या झाडांमध्ये घराच्या एकूणच वातावरणात जीवंतपणा येतो. घरात लावण्यात येणार्‍या झाडांची निवड थोडीशी कल्पकतेने आणि माहिती पूर्ण पद्धतीने केली तर केवळ हिरव्याच रंगाची झाडे लावणे टाळता येऊ शकते. कारण एकाच रंगाच्या झाडांमुळे सजावटीला एकसुरीपणा येऊ शकतो. घरामध्ये झाड लावताना ती अधिक उंच वाढणारी नसावीत. तसेच त्यांची फारशी देखभाल करण्याची गरज नसेल तर अधिक चांगले ठरते.

त्यासाठी आपण बेगोनिया हे झाड निवडू शकतो. हे एक हँगिंग प्रकारातील झाड आहे. नोकरदार महिलांसाठी हे झाड चांगला पर्याय ठरू शकते, कारण सकाळ, संध्याकाळ केवळ पाणी टाकले तरी हे झाड चांगले वाढते. मात्र हे झाड वाढताना त्याला एका काठीचा आधार द्यावा लागतो. यामुळे ते झाड व्यवस्थितपणे वाढू शकते. हँगिंग असले तरीही हे झाड सामान्य कुंडीतही लावता येऊ शकते.

ज्यांच्या घरात थेट सूर्यप्रकाश येतो अशांनी जास्वंद या जातीतील वेगवेगळ्या रंगाच्या फुलांची झाडे लावावीत. या झाडाला जास्त उष्णता लागते. त्यामुळे गॅलरीत अथवा ऊन येणार्‍या खिडकीत हे झाड ठेवावे. या झाडाला पुरेसे पाणी दिले, तर हे झाड चांगले वाढू शकते. जास्वंदामध्ये लाल, पिवळा, केशरी, गुलाबी, पांढरा असे अनेक रंगांचे पर्याय असतात. त्यापैकी आपण आपला आवडता पर्याय निवडू शकतो.

- Advertisement -

ऑर्किडचे झाडही आपण घरात वाढवू शकतो. अर्थात यामध्ये योग्य प्रकारचे ऑर्किड निवडणे गरजेचे असते. कारण काही ऑर्किडस् कमी सूर्यप्रकाशात वाढतात तरी काहींना वाढण्यासाठी मातीची गरज नसते. आपल्या घराची रचना लक्षात घेऊन आर्किडची निवड करावी. त्यासाठी माहिती असणार्‍या व्यक्तीकडून योग्य तो प्रकार निवडावा. ऑर्किडची फुले फारच सुंदर असतात. त्यामुळे या फुलांनी घराला वेगळीच शोभा मिळेल.

अ‍ॅग्रीकल, व्हॉयलेट हे झाड घरात लावण्यासाठी अतिशय चांगलं आहे. कारण या झाडाची उंची फारशी वाढत नाही. या झाडाला सूर्यप्रकाशाची गरज असते. त्यामुळे त्यांना खिडकीत ठेवावे. या झाडाला पाण्याची मुबलक गरज असते. त्यामुळे या झाडाला वेळोवेळी पाणी घालावे लागते. शक्यतो याची माती थोडी ओलसरच ठेवावी, याचा अर्थ भरमसाठ पाणी टाकावे असा होत नाही. या झाडाची फुलेही खूप सुंदर असतात. पण हे झाड जास्त वाढले तर त्याला फुले येणे बंद होते. त्यामुळेच या झाडाच्या फांद्या वेळोवेळी कापत रहाव्या. या व्यतिरिक्तही ऑफिस टाईम, बॅटन गुलाब, लिली यासारखे बरेच पर्याय घरात लावण्यासाठी उपलब्ध आहेत. घरातील उपलब्ध जागेनुसार आणि आवडीनुसार त्यांची निवड करून त्यांच्या रंगीबेरंगी फुलांमुळे घराची शोभा अधिक वाढवता येऊ शकते.

अपर्णा देवकर

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या