अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
रेल्वे स्टेशन परिसरातील मालधक्का येथे काम करणार्या तरूणावर रविवारी (3 ऑगस्ट) सकाळी 11.30 च्या सुमारास कोयत्याने हल्ला करण्यात आला. लखन बबन पेटारे (वय 28 रा. रेल्वे स्टेशन, आदर्श गौतमनगर, अहिल्यानगर) असे जखमी तरूणाचे नाव असून त्यांच्यावर सध्या कायनेटिक चौकातील हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.
उपचारादरम्यान त्यांनी दिलेल्या जबाबावरून कोतवाली पोलीस ठाण्यात तिघांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पंडीत सुखदेव खुडे, सनी पंडीत खुडे व पुजा पंडीत खुडे अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. जबाबानुसार, लखन पेटारे हे त्यांच्या कामाच्या ठिकाणी ओळखीच्या विष्णू सुळे नावाच्या व्यक्तीशी बोलत असताना अचानक त्यांचे नातेवाईक पंडित खुडे हा तेथे येऊन त्यांना शिवीगाळ करू लागला. पेटारे यांनी विरोध करताच खुडे याने त्यांना धमकी देत तुला दाखवतोच असे म्हणत त्याचा मुलगा सनी खुडे व पत्नी पूजा खुडे यांना येथून बोलावून घेतले.
नगर-दौंड रस्ता, सुभद्रानगर येथून दुचाकीवरून आलेल्या या दोघांनी पेटारे यांना पुन्हा एकदा दमबाजी व शिवीगाळ केली. त्यांना समजविण्याचा प्रयत्न करत असताना सनी खुडे याने अचानक पाठीमागून येऊन पेटारेंच्या डोक्यात व हातावर कोयत्याने वार केला. या हल्ल्यात पेटारे जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. पोलीस अधिक तपास करीत आहेत.




